Dalai Lama: जागतिक स्तरावर कुरापतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या चीनचा डोळा सध्या एका 8 वर्षीय मुलावर आहे. हे कोणतं नवं प्रकरण नाही. तर इथंही चीन कूटनिती वापरताना दिसत असल्याचं स्पष्ट होत आहे. अधिकृत माहितीनुसार मंगोलियाच्या 8 वर्षीय मुलानं चीनच्या नाकीनऊ आणले आहेत. परिणामी चीनकडून सातत्यानं या मुलाला ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.
8 वर्षांचा हा मुलगा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तो तिसरे तिबेटन धर्मगुरू 10 वे खलखा जेटसन धम्पा रिनपोछे यांचा पुनर्जन्म आहे असं समजलं जात आहे. खुद्द दलाई लामा यांनीच या मुलाला ही उपाधी दिली आहे.
तिबेटन धर्मगुरुंचा अवतार समजला जाणाऱ्या या मुलाचं खरं नाव, ए अल्तान्नार आहे. तो अवघ्या 8 वर्षांचा आहे. दलाई लामा आणि पंचेन लामा यांच्यानंतर हाच मुलगा बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात मोठा धर्मगुरु ठरत आहे. बौद्ध धर्मात पुनर्जन्माला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त असल्यामुळं अल्तान्नारही तितकाच खास आहे. त्याला तिबेटन धर्मगुरुपदी विराजमान करण्यासाठी (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेशात एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामुळं चीनचा तिळपापड झाला. कारण, हिमाचल ही तिच जागा आहे जिथं दलाई लामा यांचं निवासस्थान असून, तिबेटमधील (Tibet) निर्वासित शासनाचं कामही इथूनच चालतं.
या मुलाची धर्मगुरूपदी निवड होण्याची गोष्टही रंजक आहे. अल्तान्नारला इतर काही मुलांसोबत मंगोलियाची राजधानी उलानबटार येथे नेण्यात आलं होतं. एका मोठ्या मठामध्ये त्या मुलांना धार्मित वस्तू अस्ताव्यस्त असणारी एक जागा दाखवण्यात आली. तिथं मुलांचं लक्ष वेधणाऱ्या इतरही काही गोष्टी होत्या. इतर सर्व मुलांचं लक्ष त्या गोष्टींकडे गेलं पण, अल्तान्नार मात्र त्या धार्मिक वस्तू व्यवस्थित लावू लागला आणि त्याच्याचलं वेगळेपण अनेकांनीच टीपलं.
फक्त आणि फक्त कम्युनिस्ट पक्षाकडेच बौद्ध लामांना निवडण्याचा अधिकार आहे असा आदेश 2007 मध्ये चीनच्या सरकारनं जारी केला होता. चीनच्या बाहेरील कोणीही व्यक्ती किंवा समूह या निर्णयाला प्रभावित करु शकत नाही. पण, या दरम्यानच लामांनी घेतलेल्या या निर्णयामुळं चीनच्या पायाखालची जमीन सरकली असून, ते या मुलाला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत.