Sharad Pawar NCP Video : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राजकीय पटलावर अनेक घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली असून, मागच्या साधारण वर्षभरामधील ही सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हटली तरी हरकत नसेल, कारण देशातील मातब्बर राजकारणी अशी ओळख असणाऱ्या आणि ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा पाया रचला अशा शरद पवार यांनाच एका निर्णयामुळं राजकीय धक्का बसला आहे.
विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट म्हणडेच मूळचा ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असा, मोठा आणि खळबळजनक निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला. पक्षाच्या नावासोबतच पक्षाचं ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्हसुद्धा निवडणूक आयोगानं अजित पवार गटालाला देत त्यांच्याच बाजूनं हा निर्णय दिला. ज्यानंतर राजकीय वर्तुळातून या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
इथं या निर्णयानं जबर धक्का बसलेल्या शरद पवार गटाकडून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा करण्यात आली तर, तिथं याच गटाकडून कार्यकर्त्यांना भावनिक सादही घालण्यात आली. पक्षाच्या वतीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला, जिथं राजकारण कोळून प्यायलेले शरद पवार आपल्या अनुभवाच्या बळावर विरोधकांना 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?' असा सवाल करत, मी थकणार नाही, थांबणारही नाही असं आव्हान देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ 2022 मधील असला तरीही शरद पवार यांचे शब्द आणि त्यांचं म्हणणं आजही तेच आहे असा विश्वास पक्षाच्या वतीनं कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.
२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!#sharadpawar… pic.twitter.com/agB3W4nROh
— NCP (@NCPspeaks) February 6, 2024
@NCPspeaks या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये शरद पवार म्हणताना दिसतायत, 'मी आता 80-82 वर्षांचा झालो, म्हातारा झालो म्हणतायत... मी त्यांना सांगितलं कुणाला सांगता म्हातारा झालो? तुम्हाला काय ठाऊक अजून, जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही थांबणार नाही'. व्हिडीओच्या अखेरी शरद पवार गटाकडून 'थकणार नाही, झुकणारही नाही' असं आश्वासन साथ देणाऱ्या प्रत्येकाला देण्यात आलं आहे.
'2022 च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!', असं ठाम मत मांडत या आव्हानाच्या प्रसंगीसुद्धा इतरांची साथच पक्षाला बळ देणारी असेल अशी भूमिका पक्षाच्या बाजूनं मांडण्यात आली.