लोकसभा निकाल : विरोधक आणि लोकशाही

 नमो आणि विरोधक या वादात तटस्थ राहून जो चुकतोय त्याला जाब विचारणे बंद होत चालले आहे..! 

Updated: May 29, 2019, 09:24 PM IST
लोकसभा निकाल : विरोधक आणि लोकशाही title=

कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आणि व्हाट्स अपच्या अनेक ग्रुप वर नमो भक्त आणि विरोधक यांच्यात वाद सुरू झाले...! काही चांगल्या मित्रांची भांडणे झाल्याचे ही पाहिले..! आता निवडणूक झाली निकाल लागला आता तरी हे शांत होईल असे वाटत असले तरी तसे होताना दिसत नाही..! जो नमो विरोधात बोलत होता त्याला अजूनही टार्गेट करत असंख्य पोस्ट टाकल्या जात आहेत...! त्यात अनेकांचे वैयक्तिक संबंध बिघडल्याचे स्पष्ट जाणवत आहे... अनेकांना जो तटस्थ आहे त्याला याची स्पष्ट जाणीव होत असेल पण नमो आणि विरोधक या वादात तटस्थ राहून जो चुकतोय त्याला जाब विचारणे बंद होत चालले आहे..! 

एकाची बाजू घेतली की लेबल लावले जाणार या भीतीने अनेकजण शांत आहेत...! आणि हीच भीती आहे...! आता ती लोकशाहीला आहे की कशाला याचा विचार ज्याने त्याने केलेला बरा...! पण थोडेसे शांत राहून तुम्ही ज्या व्हाट्स अप ग्रुप मध्ये आहात त्यात सुरू असलेला वाद पहा आणि ठरवा....!

हे झाले व्हाट्स अप चे...! आता निवडणुकांतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर...! मोदी त्सुनामी येताच राहुल नॉट रीचेबल झाले.... मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील सरकार जाणार की राहणार याची चर्चा सुरू झाली...! अनेक स्थानिक पक्ष तर गलितगात्र झाले...! पश्चिम बंगाल मधल्या आमदार, नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला...! महाराष्ट्रातही काँग्रेसचे, राष्ट्रवादी चे अनेक दिग्गज नेते भाजप च्या वाटेवर आहेत...! एकूणच काय तर निवडणुका आणि भवितव्य राखायचे असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही हे चित्र संपूर्ण देशात आहे, काही अपवाद वगळता...! अर्थात भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या प्रचंड कष्टाचा तो परिणाम आहे यात शंका नाही...! 

लोकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना कमालीचे यश आले आहे...! पण हे जरी खरे असले तरी विचारधारेच्या नैतिक पायावर अनेक नेत्यांनी पक्ष निवडले प्रसंगी पराभव पत्करला पण विचारधारेशी प्रतारणा केली नाही..! पण आता केवळ जिंकणे आणि अस्तित्व टिकवण्यासाठी भाजप मध्ये होत असलेले प्रवेश मात्र चिंता करायला लावणारे आहेत...! असेच होत राहिले तर देशात विरोधक राहणार नाहीत...! ज्या विचारधारेच्या जीवावर भाजप आज उभा आहे त्यात विरोधी विचारधारेच्या पण केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे भाजप च्या मूळ पायाला धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही...!

विरोधक नसेल तर सत्ताधारी निरंकुश होण्याची शक्यता नाकारता येत नाही...! त्याचमुळे कमकुवत विरोधक मात्र लोकशाहीला मारेसा आहे का ? याचाही विचार तटस्थ राहून करणे गरजेचे आहे...! अर्थात विरोधकांनीही वेळ स्वतः ओढवून आणल्यामुळे त्यांना सहानभूती मिळवावी असे काहीच नाही...! पण ते कमकुवत असणे हे हिताचे नाही हे मात्र नक्की..! पण अगदीच लोकशाहीच्या नावाने गळा काढणे ही योग्य नाही...! भारताची लोकशाही टिकते ती इथल्या जनतेच्या विवेकबुद्धीवर...! त्यांची विवेकबुद्धी चांगली आहे हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे..! पण एकूणच विरोधकांचा पळपुटेपणा, तटस्थ लोकांनी भूमिका न घेणे हे मात्र चिंता करायला लावणारे आहे हे ही तितकेच खरे...!