शैलेश मुसळे, मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी झालेल्या एका मोठा घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. देशातील सर्वाधिक कर मुंबईकरच भरतात. रेल्वेला सर्वाधिक पैसा हा मुंबईतून जातो. तरी मुंबईकरांचे इतके हाल का?. मुंबईतील सर्वात महत्त्वाचं स्टेशन असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाशी जोडलेला एक फुटब्रिज पडला आणि यामध्ये ६ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर जवळपास ४० जण जखमी झाले. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळेला अनेक चाकरमानी घरी जाण्यासाठी निघालेले असतात. त्यामुळे या पुलावर लोकांची गर्दी असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दुर्दैवी घटनेनंतर याची जबाबादारी घ्यायला देखील कोणी तयार नव्हतं. रेल्वे प्रशासनाने याची जबाबदारी ही मुंबई महापालिकेची असल्याचं सांगत हात वर केले. राज्य सरकारने दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देऊन यातून अंग काढून घेतलं. आता दोषींवर कधी आणि काय कारवाई होते याची वाट पाहावी लागणार. पण ज्यांनी प्राण गमवले त्यांचं काय?. त्या कुटुंबाचं काय ज्यांनी आपल्या घरातील एक जबाबदार व्यक्ती गमवला. काही पैशांची मदत देऊन ही हानी खरंच भरून काढता येते का?
मुंबईत घडलेल्या या घटनेनंतर आता अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या अनेकांच्या चर्चेत हा प्रश्न होता की, आता पुलावरुन जायचं की नाही. अशा घटनेनंतर विरोधकांची भूमिका देखील राजकीयच असते. राजीनामे मागायचे आणि गप्प बसायचं. परत हे सरकारमध्ये आले की त्यांच्या काळातही हीच गोष्ट होत राहणार. लोकांना नुसतं गृहीत धरलं जातं. अनेक वर्षांनी मुंबई आणि महाराष्ट्राला रेल्वेमंत्रीपद मिळालं. पण अजूनही अनेक स्थानकांची स्थिती बदलली नाही आणि रेल्वे प्रवास सुरक्षित होऊ शकलेला नाही. अशा घटना घडल्या की फक्त शोक व्यक्त करायचा आणि काही पैसे देऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करायचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे या पुलाचं जेव्हा ऑडिट करण्यात आलं तेव्हा हा पूल सुरक्षित असल्याचं म्हटलं गेलं. मग यांनी डिग्र्या काय पैशे देऊन खरेदी केल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. इतर देशांच्या तुलनेत आपण अजूनही खूप मागे आहोत याचं हे स्पष्ट उदाहरण आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर असे जुने पूल आहेत. हे पूल कितीही सुरक्षित असल्याचं जरी म्हटलं गेलं तरी आता लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. पण नाईलाज असल्याने लोकं जीव मुठीत घेऊन त्यावरुन जातीलच. कधीही न थांबणारी आणि कितीही संकट आली तरी त्याचा एकजुटीने सामना करणारी मुंबई. पण असं असलं तरी आम्हाला इतकंही गृहीत धरु नका की जीव जात राहतील आणि त्यानंतरही आम्ही शांत बसू. मुंबईकरांचा संयमाचा बांध ज्या दिवशी फुटेल त्या दिवशी त्याला आवरणं इतकं कठीण होऊन जाईल की याची कल्पना देखील प्रशासन करु शकणार नाही.
मुंबई महापालिकेने कोर्टात सांगितलं होतं की, आम्ही ४४५ धोकादायक पुलांची पाहणी करत आहोत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात अजून किती पूल पडणार आहेत.? त्याची कल्पना करा. कारण या घटनेनंतर ही प्रशासन नेहमी प्रमाणे काही मोठी पाऊलं उचलेल असं वाटत नाही. परळ स्थानकावरच्य़ा रेल्वे पुलावर गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं झालं. त्याआधी अनेकदा तक्रारी देऊनही शेवटी जे व्हायचं तेच झालं. काही जणांचे बळी गेल्यानंतरच आमच्या प्रशासनाला जाग येते. २०१७ मध्ये परळ-प्रभादेवी स्थानकावरील पूलावर चेंगरा-चेंगरी झाली. त्यानंतर २०१८ मध्ये अंधेरी येथे पूल कोसळला. आता २०१९ मध्ये सीएसएमटी येथील पूल कोसळला. ३ वर्षात लागोपाठ तीन मोठ्या घटना.
या घटनेनंतर रुग्णालयांमध्ये राजकारण्यांची गर्दी झाली होती. कारण निवडणुका तोंडावर आहेत. ५ वर्ष कुठेच न दिसलेले अचानक कॅमेऱ्यासमोर दिसू लागले. असो हा मुंबईकर आहे. किती ही संकटं आली तरी तो आपलं पोट भऱण्यासाठी रोज घराबाहेर पडतोच. याला नाईलाज म्हणा किंवा स्पिरीट म्हणा पण आमचं प्रशासन आणि नेते यातून काही तरी शिकतील का?. हाच खरा प्रश्न आहे. तोपर्यंत पुढच्या घटनेची वाट पाहुयात...