close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?

गुरु पौर्णिमेला अनेक शिष्य त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूच्या चरणी आपली निष्ठा वाहतात. राजकीय क्षेत्र ही त्याला अपवाद नाही.

कैलास पुरी | Updated: Jul 31, 2019, 08:38 PM IST
पिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : गुरु पौर्णिमेला अनेक शिष्य त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूच्या चरणी आपली निष्ठा वाहतात. राजकीय क्षेत्र ही त्याला अपवाद नाही. या क्षेत्रात ही अनेक नेत्यांनी त्यांच्या शिष्याना गुरुमंत्र देत मोठे केले आहे. तसा विचार केला तर राजकीय गुरु शिष्यांची ही यादी खूप मोठी होणार आहे. पण आजचा हा लेख आहे पिंपरी चिंचवड मधल्या राजकीय गुरूचा.

अर्थातच पिंपरी चिंचवड मध्ये कुणी काही ही दावा केला तरी, इथे आज ही गुरु म्हंटले की डोळ्यापुढे चित्र उभे राहते ते अजित पवार यांचे. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये अनेकांना शिष्यत्व दिले. लहान मोठ्या कार्यकर्त्यांचा विचार केला, तर ही यादी खूप मोठी होणार आहे. पण या यादीत सर्वाधिक वरचे नाव येईल ते भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे. पुढे विलास लांडे आणि महेश लांडगे...पण राजकीय क्षेत्रात गुरूला नाही तर,  संधी आणि परिस्थितीलाच महत्व असते हे सहज पहिले तरी लक्षात येते.

गुरु पौर्णिमेला अजित पवार यांना शहरातून काय मिळाले? याचा विचार केला तर याच साठी केला होता का अट्टाहास?, असा विचार अजित पवार यांच्या मनाला शिवून जाण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण जगताप यांनी कारकीर्द अजित पवार शहरात दाखल होण्यापूर्वी केली असली, तरी त्यांचे खरे सूर जुळले ते अजित पवार यांच्या बरोबर. नगरसेवक, महापौर ते शहरातील तगडा ताकतवान नेता हा प्रवास अजित पवार यांच्या आशीर्वादाने झाला ही वस्तू स्तिथी आहे. अगदी विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकात आमदार होण्यासाठी अजित पवार यांनी केलेले सहाय्य लक्ष्मण जगताप यांना शहरातील सर्वात ताकतवान नेता होण्यासाठी उपयोगी ठरला हे उघड सत्य आहे.

राज्यातील अजित पवारांचा वचक कमी होत असताना पिंपरी चिंचवड त्यांना हात देईल अशी अपेक्षा असताना पहिला धक्का बसला तो लक्ष्मण जगताप यांचा. विधानसभेला भाजप प्रवेश करत या शिष्याने अजित पवारांना पहिला धक्का दिला. दुसरा धक्का महापालिकेच्या निवडणुकीत देत जगताप यांनी अजित पवार यांना योग्य ती गुरुदक्षणा दिली.

विलास लांडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली नसली, तरी बरोबर राहून ही अजित पवार यांना विशेष मदत केली असे नाही. विलास लांडे यांनाही अनेक पदे देत आमदार होण्यासाठी अजित पवारांनी मोठी शक्ती खर्च केली. पण महापालिका निवडणुकीत भोसरी मतदार संघात जोरदार ताकत लावत राष्ट्रवादीला पर्यायाने अजित पवार यांना मदत करणे अपेक्षित होते, पण लांडे यांनी केवळ स्वतःच्या मुलाच्या विजयासाठी तडजोड करत निवडणूक सोडून दिली. आणि अजित पवारांना गुरुदक्षिणा दिली. त्यानंतर ही राष्ट्रवादी मध्ये असून ही अजित पवार यांना ताकत देण्याचे काम त्यांच्या कडून होत नाही. अनेकदा अडचणीत असताना मदतीला धावून आलेल्या अजित पवार यांना आज ही गरज असताना लांडे यांच्या कडून अपेक्षित साथ मिळत नाही.

महेश लांडगे यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समिती अध्यक्षपद देत अजित पवार यांनी मोठी राजकीय 'रिस्क' घेतली. अपेक्षा एवढीच होती की विधानसभा निवडणुकीत ते काही गडबड करणार नाहीत, पण झाले उलटेच. विधानसभेला स्थायीतून मिळालेल्या रसदीच्या जोरावर लांडगे मैदानात उतरले आणि अपक्ष निवडून आले. त्यानंतर ते काही करणार नाही असे वाटत होते पण उरली सुरली कसर महापालिका निवडणुकीत भरून निघाली. लांडगे यांनी ही भाजप मध्ये प्रवेश करत अजित पवार यांना महापालिका सत्तेतून हद्दपार करण्यासाठी हातभार लावला आणि पवारांना गुरुदक्षिणा दिली.

या मोठ्या नेत्यांबरोबरच शहरातले अनेक पदाधिकारी नगरसेवक यांनी ही अजित पवार यांना गुरुदक्षिणा देत शहरातून हद्दपार करण्यात हातभार लावला. पण अर्थातच फोडाडाफोडीचे राजकारण करण्यात माहीर असलेल्या अजित पवारांना जी काही गुरुदक्षिणा मिळाली ती त्यांनी जे पेरले ते उगवले या तत्वाने. त्यातच राजकारणात गुरु किती ही मोठा असला तरी संधी मिळताच गुरुच्या डोक्यावर पाय ठेवून शिष्य त्याची जागा कधी पटकावले हे सांगता येत नसते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला अजित पवार किमान पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यात आपण शिष्यांच्या बाबतीत चुकलो कुठे हा विचार करतील अशी अपेक्षा...!