'मोनो' मधील तो जीवघेणा प्रसंग, जीव घेतला की डोळे उघडणार का?

मोनोचा सावळा गोंधळ. जिवावर बेतणार?

'मोनो' मधील तो जीवघेणा प्रसंग, जीव घेतला की डोळे उघडणार का?

४ सप्टेंबर. रात्री मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस पडला होता. पहाटे ४.३० ला उठलो. पाऊस थांबला होता. माझी ऑफिसला निघण्याची तयारी सुरु होती. ५.४० ला घरातून बाहेर पडलो. तेव्हा तसा पाऊस नव्हता. मी लोकल पकडली आणि निघालो ऑफिसला. मी ७ वाजण्याच्या आधीच ऑफिसला पोहोचलो. सकाळी पावसाची रिपरिप सुरु होती. कधी नव्हे तो हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. सकाळी दहानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस कोसळत राहिला. मुंबई, सखल भागात तुंबत चालली होती. पाऊस थांबेल, पाणी ओसरेल या आशेवर मुंबईकर होता. मात्र, क्षणात पावसाचा जोर आणखी वाढला. तुंबलेले पाणी फुगू लागले. मुंबईचे हळूहळू तळे होण्यास सुरुवात झाली. त्याचा पहिला फटका रेल्वेला (मुंबई लोकल) बसला. कुर्ला, सायन येथे पाणी रुळावर आले आणि मध्य, हार्बर रेल्वेचे तीन तेरा वाजले. त्यानंतर पश्चिम मार्गावरची लोकल सेवाही बंद पडली. तोपर्यंत पाण्याची पातळी वाढत होती. तसेच पश्चिम रेल्वेवरीलही सेवा कोलमडली. मुंबईतील रस्ते वाहतूकही बंद होत गेली. बेस्टची सेवाही अनेक ठिकाणी बंद पडली होती. रिक्षा, टॅक्सीवाले भाडे नाकारु लागलेत. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्ग आणि बेस्ट सेवा कोलमडल्याने मुंबईकरांचे परतीचे सगळे मार्ग बंद झाले होते.

मुंबईकरांच्या खिजगणीत जी सेवा नव्हती, त्या मोनो रेलला एकदम मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी 'मोनो' प्रशासनाला पेलली नाही. व्हायचे तेच झाले. मोनो रेल प्रशासनाच्या धिम्या कारभारापुढे मुंबईकरांना हात टेकावे लागले. अनेकांनी तीन ते पाच तास रांगेत उभे राहून तिकीट काढले. मोजून ५० तिकीटेच देण्यात येत होती. मात्र, त्यासाठी सात ते आठ तास प्रवासासाठी वेटिंग करावे लागले. मोनो रेलचा सावळा गोंधळ दिसून येत होता. मोनो रेलवर एकाही स्टेशनवर प्रवाशांसाठी प्रसाधनगृहाची सोय नव्हती की बससण्याची. त्यामुळे तीन ते पाच तास रांगेत उभे राहून पुन्हा उभ्याने प्रवास करावा लागत होता. अक्षरश: प्रवाशांचे हाल होत होते. कोंबून आणि गर्दीत प्रवास सुरु होता. त्यामुळे एखाद्याचा गुदमरुन जीव जातो की काय, अशी अवस्था झाली होती.

त्याआधी मी मात्र, घरी निघण्यासाठी ऑफिसमधून ४.०५ वाजता बाहेर पडलो. टॅक्सीसाठी वाट पाहत होतो. मात्र, टॅक्सीवालेही नवी मुंबईत यायला तयार नव्हतेत. मग विचार केला. चेंबूरपर्यंत मोनोने जाता येईल. मोनो रेल स्टेशन ऑफिसजवळ असल्याने तिकडे गेलो. तिकीटसाठी रांग पाहून थक्क झालो. तिकीटासाठी दोन्ही बाजुनी लांबच रांग होती. काही जण तर दोन वाजल्यापासून रांगेत होते. मी ४.१७ वाजता रांगेत उभा राहिलो. तिकीट खिडकीजवळ आलो त्यावेळी पुढे १० जण होते. मला तिकीट मिळणार या आनंदात होतो. ५० तिकीटे दिल्यानंतर तिकीट बंद करण्यात आले. पुन्हा रांगेत ताटकळत होतो. मला ६.३० वाजता तिकीट मिळाले. स्टेशनवर आलो तर आलेली मोनो खचाखच भरलेली होती. मला काही कळत नव्हते काय करायचे ते. घरी तर जायचे होते. रेल्वेत जशी गर्दी नेहमीच असते त्याप्रमाणे मी मोनोत चढलो. लोअर परेल येथून सायंकाळी ६.४५ वा. मोनो सुटली. लोकांनी ३ ते ५ तास रांगेत उभे राहून तिकीट काढलीत. खूप गर्दी असल्यामुळे काहींना चढता आले नसल्याने स्थानकात तिठत उभे राहावे लागले. वाढती गर्दी लक्षात घेऊन 'मोनो'तून किती प्रवासी प्रवास करु शकतात, याचे गणित मांडले गेले नाही. त्यामुळे 'मोनो'च्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्याने मोनो कासव गतीने पुढे धावू लागली. वळणावर तर  'मोनो' जागची हलेना. कसेबसे डुगू डुगू करत 'मोनो' पुढे जात होती. भक्ती पार्क स्टेशन सोडल्यानंतर काहीशा अंतराजवळ वडाळा डेपोजवळ एका वळणार मोनो बंद पडली.

आता सुरु होईल. नंतर सुरु होईल, असे सांगता सांगता एक तास झाला. त्याचवेळी मोनो एका बाजुला अधिक झुकल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना धीर देण्यासाठी 'मोनो'चे कर्मचारी पुढाकार घेताना दिसत नव्हतेत. त्यांना काय करायचे तेच समजत नव्हते. मात्र, दररोज 'मोनो'तून प्रवास करणाऱ्यांपैकी एकाने घाबरुन जाऊ नका. असा अनेक वेळा मला प्रत्यय आला आहे, असे सांगत धीर देण्याचा प्रयत्न करत होता. त्याचत  'मोनो' ज्या ठिकाणी बंद पडली. त्याठिकाणी आधी अपघात झाला होता. याची चर्चाही रंगू लागली आणि भितीचे काहूर अधिक गडद झाले. त्याचवेळी अग्निशमन दलाची गाडी  जाण्याचा आवाज आला. कोणीतही बोंबलले आता आपल्याला क्रेनच्या सहायाने बाहेर काढले जाईल. दरम्यान, 'मोनो' ज्या ठिकाणी बंद पडली त्याठिकाणी खाली मोठे गटार होते. त्यामुळे काचेतून सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. त्यामुळे महिला वर्ग अधिक चिंतेत पडला. देवाचा धावा करु लागले. गणपती बाप्पा मोरया, असे म्हणत आपली भिती घालविण्याचा प्रयत्न करत होता. 'मोनो' बंद पडलेल्या गोष्टीला दीड तास होत आला. एसी बंद असल्याने ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अनेक घामाघूम झाले. श्वास घेण्यास त्रास होवू लागला. आता आपले काही खरे नाही, याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.

त्यानंतर कोणीतरी आवाज दिला. सगळ्यांनी एका बाजुला या पटापट. एक तासाने सगळ्यांना एकाच बाजूला लोड करायला सांगितले. मोनो एका वळणावर एकाच बाजूला कळंडली होती. त्यामुळे प्रवासी खूप घाबरले होते. त्यानंतर मोनो सुरु झाली आणि मागच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरु झाला. अन्यथा 'मोनो'त गुदमरुन पडण्याची वेळ आली असती. मोनो मागे घेत भक्ती पार्क येथे आणली. रात्री ८.४५ वाजल्यापासून दुसरी मोनो रेल रात्री ९.४५वाजेपर्यंत आलेली नाही. त्यात  पाऊसही पडत होता. प्रवासी अधिक पँनिक झाले होते. मोनो रेल प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. काय करायचे या चिंतेत सगळे होते. तेवढ्यात दुसरी मोनो आली, ती सुद्धा खचाखच भरलेली. त्यामुळे कोणाला आत शिरता येत नव्हते. काही जण चढले आणि पुन्हा गोंधळ सुरु झाला. दुसरी मोनोही पुन्हा अर्धा तास भक्ती पार्क स्टेशनमध्ये उभी. कोणीही कोणाचे ऐकत नव्हते. अनेकांनी गोंधळ घातला. खचाखच भरलेली मोनो पुन्हा कासव गतीने पुढे जात होती. अखेर रात्री ११.१५ वाजता कशीबशी चेंबूरला पोहोचली आणि सर्वांनी रोखलेला श्वास सोडला. उतरलेले प्रवासी मिळेल त्या वाहनाने घरी परतले.