close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मृत्यूनंतर भारताचा 'हिरो' ठरलेल्या पाकिस्तानी 'मेजर'ची कहाणी

भारताचा खरा 'ब्लॅक टायगर'..

Updated: Jul 19, 2019, 07:35 AM IST
 मृत्यूनंतर भारताचा 'हिरो' ठरलेल्या पाकिस्तानी 'मेजर'ची कहाणी

कोमल वावरकर,  मुंबई : लोकसंख्येच्याबाबतीत भारत देश हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या सुरक्षतेसाठी अनेक जवान त्यांच्या प्राणांचे बळीदान देतात. मात्र एक क्षेत्र असे आहे की, जिथे प्राणांची आहुती देऊनही लोकांपर्यत त्यांचे नावदेखील पोहोचत नाही. आणि ते क्षेत्र म्हणजे भारतीय सुरक्षा एजेन्सी म्हणजेच 'रॉ'... 'रॉ' (RAW) अर्थात 'रिसर्च अॅन्ड एनालिसिस विंग'. 

धाडसी क्षेत्र 

या क्षेत्रात फार कमी जण जातात. या क्षेत्रात स्वतःच्या कामाबद्दलची माहिती लपवावी लागते. एक प्रकारे हे गुप्तचराचे कार्य आहे. या क्षेत्रात जाण्यासाठी फार मोठे धाडस लागते. अनेक धोके या क्षेत्रात गुप्तचराला पत्कारावे लागतात. गुप्तहेरांना कुठल्या देशात जाण्यास सांगितले तर त्यांना जावे लागते. गुप्तचराला ज्या देशात पाठवितात त्या देशांमधील सुरक्षेबाबतील माहिती गुप्तहेराला मिळवून आपल्या देशाला द्यावी लागते. या कामात जोखीम मोठी असली तरी गुप्तहेर देशाच्या सुरक्षेसाठी अनेक धोके पत्कारतात.

ब्लॅक टायगर - रवींद्र कौशिक 

भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की,  तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात. मुस्लीम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं. त्यावेळी भारत सरकारने कौशिक यांची कामगिरी जाहीर केली नाही.  परंतु, नंतर मात्र भारत सरकारनं रवींद्र कौशिक हे भारताचे नागरिक होते, असं जाहीर केलं. रविंद्र कौशिक यांचं काम एका मिशनपुरतं मर्यादीत राहिलं नाही तर ते पाकिस्तानमध्ये राहून पाकिस्तान सेनेच्या मेजर पदापर्यंत जाऊन पोहचले. पाकिस्तानमध्ये राहून त्यांनी अनेक माहिती ही भारतापर्यत पुरवत असत. 

भारतीय नागरिक ते पाकिस्तान सेनेचा मेजर

रवींद्र कौशिक यांचा जन्म राजस्थानमधील श्रीगंगानगर या जिल्हात झाला होता. २३ वर्षाचे असताना त्यांनी 'भारतीय गुप्तचर संस्था' म्हणजेच 'रॉ'मध्ये कौशिक रुजू झाले होते. १९७५ या साली कौशिक यांना पाकिस्तानमध्ये एका गुप्त कामगिरीसाठी धाडण्यात आलं. पाकिस्तानला जाण्यापूर्वी त्यांची 'सुंता'ही करण्यात आला होती. कौशिक यांनी 'नबी अहमद शेख' असं नवं नाव आणि नवी ओळख धारण करत पाकिस्तानात प्रवेश मिळवला. 

पाकिस्तान या भारताच्या शत्रू देशात त्यांनी कराची शहरामध्ये लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी इथूनच कायद्याची पदवी प्राप्त केली. कौशिक यांना लवकरच भारतासाठी माहिती गोळा करायची होती. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानी सेनेची परीक्षा दिली आणि कौशिक परिक्षेत उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते पाकिस्तानी सेनेत रुजू झाले. पाकिस्तानी सेनेत त्यांनी काही काळ काम केल्यावर त्यांना 'मेजर' या पदावर बढती मिळाली. आपल्यासोबत एक भारतीय गुप्तहेर काम करत असल्याचा मागमूसही एव्हाना पाकिस्तानी सेनेला नव्हता. याच दरम्यान कौशिक यांचे एका पाकिस्तानी तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांनी तिच्यासोबत विवाहदेखील केला. कौशिक हे तब्बल ३० वर्ष आपल्या मायदेशापासून दूर राहिले. कौशिक पाकिस्तानबद्ल महत्त्वाची माहिती 'रॉ'च्या अधिकाऱ्यांना पुरवत असत.

पाकिस्तानात अटक आणि मृत्यू 

मात्र, १९८३ हे वर्ष त्यांच्यासाठी फार वाईट ठरले. त्यांना भेटाण्यासाठी 'रॉ'ने एका गुप्तहेराला पाठवलं. परंतु, रवींद्र कौशिक यांना भेटण्याअगोदरच हा गुप्तहेराला पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेनं ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर कौशिक यांची खरी ओळख आणि पाकिस्तानी ओळख समोर आली. याची कुणकुण लागताच अटक होण्याआधीच रवींद्र कौशिक भूमिगत झाले. यावेळी, कौशिक यांनी भारताला मदत मागितली. परंतु, भारतानं मात्र यावेळी कौशिक यांची खरी ओळख नाकारली. अखेर पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून कौशिक यांना अटक करण्यात आली. त्यांना सियालकोटच्या तुरुंगात डांबण्यात आलं. 

सियालकोटच्या जेलमध्ये त्यांचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला. त्यांच्यावर अनेक आरोप लागले. अनेक खटलेदेखील चालवण्यात आले. इतकंच नाही तर, भारतीय सरकारची गुप्त माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली तर मुक्त करण्याचं प्रलोभनंही त्यांना दाखवण्यात आलं. मात्र रवींद्र कौशिक यांनी जीवाला धोका असूनही भारताविषयी कुठलीही गुप्त माहिती पाकिस्तानसमोर जाहीर केली नाही.

पाकिस्तानमध्ये १९८५ मध्ये त्यांना फाशी आणि जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर त्यांना पाकिस्तानमधील 'मियाँवाली सेंट्रल जेल'मध्ये ठेवण्यात आले. २००१ मध्ये रवींद्र कौशिक यांचा तुरुंगाताच क्षयरोग (टीबी) आणि हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं पाकिस्तानने जाहीर केले.