देशासाठी धोक्याची घंटा, 'कोरोना' जमात देशभरात पसरली

भारतात कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.

शैलेश मुसळे | Updated: Apr 1, 2020, 10:30 PM IST
देशासाठी धोक्याची घंटा, 'कोरोना' जमात देशभरात पसरली

मुंबई : कोरोना आता जगभरात महामारी बनला असून संपूर्ण जगात पसरला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरु आहेत. भारतात या महामारीचं गांभीर्य पाहता पंतप्रधान मोदी यांनी आधीच लॉकडाऊन जाहीर केलं आहे. असं असताना आज राजधानी दिल्लीमध्ये निजामुद्दीन भागात तबलीगी जमातीचं केंद्र असलेल्या मरकजमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असल्याचं प्रकरण समोर आलं. ज्यापैकी २४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून जवळपास ३५० लोकांमध्ये याची लक्षणं दिसून येत आहेत. या सगळ्यांना आता वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दिल्लीत एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मरकजमध्ये मोठ्या प्रमाणात लोकं थांबली होती. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याती दाट शक्यता आहे. बंदी असताना देखील धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोना आणखी पसरतो आहे. याचं हे एक उदाहरण आहे. या लोकांनी स्वत:चाच नाही तर इतरांचा जीव देखील धोक्यात घातला आहे. दिल्लीत बंदी असताना देखील हे लोकं येथे कसे जमा झाले हा मोठा प्रश्न आहे. पण आता मात्र येथून लोकं देशभरात पसरली आहेत. त्यामुळे देशभरातून त्यांना शोधून काढण्याचं काम सुरु आहे. पण हे वाटतं तितकं सोपं ही नाही.

१३ ते १५ मार्च दरम्यान तबलीगी मरकजमध्ये जवळपास ८ हजार लोकं दाखल झाली होती. ज्यामध्ये परदेशातील लोकं देखील होती. पोलिसांनी ३ दिवसात मरकजमध्ये असलेल्या १८०० लोकांना पकडलं आहे. ज्यामध्ये २८१ जण विदेशातील आहेत. मरकजच्या या आयोजनानंतर आता अनेक लोकं हे येथून निघून गेले आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचं शक्यता आहे. काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये ज्यापैकी ६ मृत देखील आहे. हे लोकं ज्या व्यक्तींच्या संपर्कात आले असतील त्या सगळ्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची दाट शक्यता आहे.

निजामुद्दीन येथे असलेल्या तबलीगी मरकजमध्ये २ हजार लोकं होती. पण पोलिसांना याची माहिती नव्हती. भारतात सध्या सर्वांवर करडी नजर आहे. तर मग हे परदेशातून आलेले व्यक्ती येथे आले कसे.? तबलीगी मरकजच्या आयोजनामुळे आता संपूर्ण भारत अडचणीत सापडला आहे. आता प्रश्न असा आहे की यासाठी कोणाला जबाबदार ठरवायचं ? मरकजच्या पदाधिकाऱ्यांना, पोलिसांना की दिल्ली सरकारला? तबलीगी मरकज आता देशात कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढवण्याचं कारण ठरले आहेत. सरकारने अशा संस्थेच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे. कारण अशा बेजबाबदार लोकांमुळे आज हजारो लोकांचा जीव धोक्यात आला आहे.