Mumbai University Notice On Agitation: मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. परीक्षेत होणारी दिरंगाई, उशीरा लागणारे निकाल, वसतीगृहाची समस्या अशी विविध कारणांमुळे विद्यार्थी त्रस्त असतात. यासाठी विद्यापीठ प्रशासनाला वारंवार निवेदने दिली जातात. तरीही मागण्या पूर्ण न झाल्यास विद्यार्थी संघटना लोकशाही पद्धतीचा वापर करत आंदोलन, मोर्चाचा मार्ग स्वीकारतात. पण आता विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा आवाज दाबला जात असल्याची टीका विद्यापीठ प्रशासनावर करण्यात येत आहे. यामागे कारणंही तसंच आहे.
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेला एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व परिसरात कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेने बैठका, आंदोलन,मोर्चा , उपोषण आणि निषेध कार्यक्रम घेण्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे. पूर्वपरवानगी विना केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. 12 सप्टेंबर 2024 रोजी व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला. यानंतर हे परिपत्रक जाहीर करण्यात आले. या पत्रकाविरोधात युवासेना, छात्र भारतीसह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.
शैक्षणिक प्रश्नांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी संघटनांना रोखण्यासाठीचे हे विद्यापीठाने उचललेले पाऊल आहे. विद्यार्थी प्रश्नांबाबत सहानुभूती नसणाऱ्या प्रशासनाने जाणीवपूर्वक हा घाट रचला जात असल्याची टीका छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केली आहे. या निर्णयाचा आम्ही धिक्कार करत असून विद्यार्थी हितासाठी अशा कुठल्याही कार्यक्रमासाठी विद्यापीठाची पूर्वपरवानगी घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच छात्र भारतीकडून मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्या सर्व उप परीसरात कोणत्याही संघटनेस अथवा व्यक्तीस सभा,आंदोलने,मोर्चे,उपोषण,निषेध मोर्चा,बैठका आणि तत्सम कार्यक्रम पूर्वपरवानगी शिवाय घेण्यास मनाई करण्यात आल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. आम्ही या निर्णयाचा जाहीर निषेध करतोय असे युवासेना विद्यार्थी संघटनेकडून सांगण्यात आलंय. विद्यार्थी,पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा आवाज दाबण्याचा महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ प्रशासन यांचा प्रयत्न निषेधार्थ असल्याची प्रतिक्रिया प्रदीप सांवत यांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणुक निकाल जाहीर झाल्यावर हे परिपत्रक मागे घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहोत, असे ते म्हणाले. कुलगुरूंच्या डरपोक वृत्तीचा तीव्र निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.