कासवांच्या देशात...

वेळासला 2002 पासून कासव महोत्सव भरतो. आता तो आंजर्लेच्या किनारपट्टीवरही सुरू झाला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 20, 2019, 08:36 PM IST
कासवांच्या देशात... title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : कासवांची छोटी छोटी पिल्ले पाण्यात सोडतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात येत असतात. अशावेळी त्यांना प्रत्यक्षात पाहण्याचा मोह होतोच. समुद्र किनार पट्टीवर कासव अंडी द्यायला येतात आणि त्यानंतर साधारण 50 ते 55 दिवसांनी या अंड्यांतून छोटे छोटे कासव बाहेर येतात आणि समुद्राच्या दिशेने जगण्याच्या प्रवासाला सुरूवात करतात. वेळासला 2002 पासून कासव महोत्सव भरतो. आता तो आंजर्लेच्या किनारपट्टीवरही सुरू झाला आहे. यातून कोकण किनारपट्टीतील पर्यटनाला चालना आणि पर्यायाने स्थानिकांना रोजगारही मिळू लागला आहे.

सध्या कासवांच्या विणीचा काळ सुरू आहे. या काळात कासव समुद्रातून किनारपट्टीवर येतात आणि वाळूत खड्डा करून अंडी घालतात.  अंडी घालण्यासाठी किनारपट्टीवर येणाऱ्या मादी कासवांना आजुबाजुला कोणी असल्याची जाणिव झाली तर ते परतही जातात. किंवा दुसरीकडे जाऊन अंडी देतात. महाराष्ट्राला एकूण 720 कि.मी लांबीचा समुद्रकिनारा असून ही संपूर्ण किनारपट्टी कोकणात येते. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे या किनारपट्टीत येतात. आपल्या कोकण किनार पट्टीवर 'आँलिव्ह रिडले' प्रजातीतील कासव येतात. वाळूत खड्डा करताना मध्येच दगड वगैरे लागला तर ते दुसरीकडे जातात. शंभरहून अधिक अंडी यात असू शकतात. अंडी घालून झाल्यावर ही हुशार मादी त्यावर माती घालून ते पुन्हा वाळुशी समांतर करते. जिथे अंडी घातली आहेत तिथे वर्तुळात फिरते जेणेकरून काही खाणाखुणा राहू नयेत.  तरीही त्यांच्या सरपटत येण्याने वाळूवर खुणा राहीलेल्या असतात. आपल्याकडच्या मंडळींना सुरूवातीला याबद्दल फारशी माहिती नसल्याने ही अंडी कासवच आपल्याला देऊन जातो अशी त्यांचा गैरसमज होता. ही अंडी शरीराला पोषक म्हणून खाल्ली देखील जात. तसेच रानटी कोल्हे-कुत्रे देखील अंडी घातलेल्या ठिकाणाचा माग घेत वाळू उकरतात. पोटभर अंडी खाऊन झाल्यावर वाळू विस्कटून ही कोल्हे कुत्रे निघून जातात. साहजिकच या सगळ्याचा परीणाम कासवांच्या जन्मदरावर होतो. समुद्राच्या आतही कासवाला टिकून राहण्यासाठी स्ट्रगल काही कमी नसतं. तिथे पण मच्छिमारांच्या जाळीत अडकून, बोटीचा पंखा लागून जखमी होणाऱ्या, मरणाऱ्या कासवांचे प्रमाण जास्त आहे. हेच कासव समुद्रातील मृत मासे, किटक खातात, पाणी स्वच्छ ठेवतात. पण कासवांच्या जगण्याच्या संघर्षाचा परिणाम जलचक्रावरही होतो.

आपल्या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या सागरा कासव संरक्षण-संवर्धनाचे काम वनविभाग, भाऊ काटदरे यांचे “सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ” आणि तिथल्या ग्रामपंचायती करत आहेत. दरवर्षी कोकण किनारपट्टीतील आंजर्ले, वेळास अशा किनार्यांवर कासव महोत्सव भरवला जातो.  मोहन उपाध्ये, अभिनय आणि अजिंक्य केळसकर असे कासव मित्र देखील 'कासव महोत्सवा'ची कमान संभाळत असतात.

कासवाने अंडी दिली की मादी कासवाचं काम संपलेल असत आणि ती पुन्हा समुद्राच्या दिशेने निघून जाते. त्या अंड्यांच पुढे काय झालं हे ते काही पुन्हा बघायला येत नाही. त्यामुळे निसर्ग हेच त्याचे पुढे आईवडील बनतात. वाळूत त्या अंड्याना उब मिळते. आता सह्याद्री निसर्ग मित्र मंडळानेही या कासवांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांना सहीसलामत समुद्रात सोडण्याचे काम कासवमित्र जबाबदारीने करत असतात. 

आहे त्या ठिकाणीच कासवाची अंडी राहू दिली तर त्याची नासधूस होऊ शकते. मग अंड्यांसाठी उभारलेल्या संरक्षण कुंपणातील वाळूत ही अंडी ठेवली जातात. मादीने जितका फूट खड्डा खणला असेल तितकाच खड्डा खणून अंडी त्यात ठेवली जातात. ही अंडी ठेवत असताना त्याची रितसर नोंद केली जाते. साधारण ५० ते ५५ दिवसात या अंड्यांमधून कासवाची पिल्ले बाहेर येतात. कासव महोत्सवात आपल्याला हे सारे अनुभवता येते. कासव महोत्सवर अनुभवण्यासाठी देशभरातील पर्यटक वेळास, आंजर्लेच्या किनारपट्टीवर येत असतात. त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळाली असून स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे. मुंबईपासून केवळ 250 किमी अंतरावर हा कासवांचा प्रदेश आहे. आपण प्रत्येकाने याचा अनुभव नक्की घ्यायला हवा.

सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाविषयी...

झपाट्याने खालावत चाललेल्या कासवांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात स्वयंसेवी संस्थांचे काम सुरू आहे. फेब्रुवारी 1992 मध्ये स्थापन झालेले सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ हे निसर्ग संवर्धन, संरक्षण आणि संशोधनाचे काम करत आहे. गरुडांचे सर्वेक्षण आणि अभ्यास, वेंगुर्ला रॉक्सवरील भारतीय पाकोळ्यांच्या घरट्यांची उजेडात आणलेली तस्करी व त्यांचे संरक्षण- संवर्धनाचे प्रयत्न, सागरी संरक्षण मोहीम, गिधाडांचा अभ्यास असे अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वी केले आहेत. सह्याद्री मित्र मंडळातर्फे कासवांच्या विण हंगामात दररोज किनाऱ्यावर गस्त घालून कासवांच्या घरट्याचा शोध घेण्यात येतो आणि घरट्यातील अंडी किनाऱ्यावरील कुंपणात सुरक्षित ठेवण्यात येतात. सन 2002 ते 2003 दरम्यान 32 हजार 700 च्या वर कासवाची पिल्ले या मंडळाने समुद्रात सोडली.