रवि पत्की : फ्रेंच ओपन (French Open) संपली की विम्बलडनचे (Wimbledon) वेध लागतात. टेनिस कॅलेंडर मधिल विम्बलडन म्हणजे सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा. इथे जिंकले म्हणजे केदारनाथला जाऊन महादेवाचे दर्शन घेतल्यासारखे. आता ATP टूर वर फारतर फार 4 ते 5 ग्रास कोर्ट स्पर्धा खेळल्या जातात.
क्ले कोर्ट वरच्या फ्रेंच ओपन आणि ग्रास कोर्टवरच्या विम्बलडन यांच्यामध्ये क्विन्स क्लब ही ग्रास कोर्टवरील स्पर्धा खेळली जाते.विम्बलडनची तयारी म्हणून खेळाडू या स्पर्धेकडे बघतात. तर काही खेळाडू विम्बलडनच्या पूर्वी दुखापती होऊ नयेत म्हणून ही स्पर्धा खेळत नाही.
क्विन्स क्लबला अगदी विम्बलडन इतकी नसली तरी स्वतः ची एक प्रतिष्ठा आहे,परंपरा आहे. 1890 साली ही स्पर्धा सुरू झाली. विम्बलडन पासून 6 मैलावर असलेल्या वेस्ट केनसिंगटन येथे ही स्पर्धा होते.
पहिल्यांदा पुरुष आणि महिला दोघांकरता ही स्पर्धा होती.नंतर ती फक्त पुरुषांकरता ठेवली गेली.त्यामुळे या स्पर्धेला समांतर महिलांची स्पर्धा इस्टबोर्न येथे खेळली जाते.
ह्या स्पर्धेत सर्व सामने बेस्ट ऑफ 3 सेट्स असतात. क्विन्स क्लब जिंकून विम्बलडन जिंकणाऱ्यात मॅकएनरो,बेकर,सॅमप्रस,नडाल वगैरे अनेक खेळाडू आहेत. अँडी मरेने सर्वाधिक पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.नऊ हजार प्रेक्षक क्षमतेचे सेन्टर कोर्ट,काही मिलियन पाउंडस मधील बक्षीस रक्कम या स्पर्धेला व्यावसायिक स्पर्धेत मोठी मान्यता मिळवून देते.
मागच्या वर्षी इटलीच्या मॅटीओ बेरिटीनीने ही स्पर्धा जिंकली होती.या वर्षी फेडरर,नडाल,जोकोविच ही स्पर्धा खेळण्याची शक्यता कमी आहे.स्पेनचा नवीन टेनिस स्टार अलकारॅझ सुद्धा असणार नाही.
भारताने आपले निशाण क्विन्स क्लब च्या कोर्ट वर रोवले आहे.1959 साली रामनाथन कृष्णन यांनी ही स्पर्धा जिंकली होती.अंतिम सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या निल फ्रेझर यांचा पराभव केला होता.1977 साली अमृतराज बंधूनी दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते.त्यांनी डेविड लॉइड आणि जॉन लॉइड या भावांचा पराभव केला होता.
विम्बलडनच्या आगमनाची चाहूल या स्पर्धेने लागते.अतिशय फास्ट ग्रास कोर्टस आणि सर्व अँड व्हॉलीची मेजवानी अनुभवायला तयार रहा.13 जून पासून चालू होतेय क्विन्स क्लब.