हिवाळ्यात सहलीला जाण्यासाठी टॉप ५ स्पॉट!

पावसाळा संपला की सर्वांनाच ओढ लागते ती हिवाळ्यातील गुलाबी थंडीची. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही अनेकजण सहलीला जातात. हिवाळ्यातील थंडीचा आनंद घेण्यासाठी प्लॅनिंग करत असतात.

Updated: Nov 29, 2017, 09:13 AM IST
हिवाळ्यात सहलीला जाण्यासाठी टॉप ५ स्पॉट! title=

मुंबई : पावसाळा संपला की सर्वांनाच ओढ लागते ती हिवाळ्यातील गुलाबी थंडीची. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही अनेकजण सहलीला जातात. हिवाळ्यातील थंडीचा आनंद घेण्यासाठी प्लॅनिंग करत असतात.

काहींना नेमकी ठिकाणं माहिती असतात पण अनेकांना प्रश्न पडतो की, कुठे फिरायला जायचं. त्यामुळे ज्यांना हिवाळ्यात फिरायला कुठे जायचे असा प्रश्न पडला असेल तर त्याच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. हिवाळ्यात कुठे फिरायला जायचं याचे काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

१) माथेरान -

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत. इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण असे कधीच नसते. उन्हाळ्यात २०० ते ३००, तर हिवाळ्यात १५० ते २५० असते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या हाजीमलंगपासून ही डोंगर रांग सुरू होते. हाजीमलंगला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

२) भंडारदरा -

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व. भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे.

३) महाबळेश्वर -

महाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिग पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.

४) चिखलदरा -

जैवविविधतेने संपन्न असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण ३६६४ फूट उंचीवर आहे. विदर्भाचे नंदनवन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ते अख्ख्या महाराष्ट्रात सुपरिचित आहे. गर्द वनराईतील चिखलदऱ्यात भटकताना येथील निसर्गसृष्टीचे अवलोकन करता करता सातपुड्यातील एका उंच अशा पंचबोल पॉईंटच्या दऱ्याखोऱ्यांतून कधी कधी वाघाची डरकाळी ऐकू येते. मात्र या सर्वांवर मात करते ते येथील आल्हाददायक वातावरण. त्यामुळेच येणाऱ्या पर्यटकांची पावले येथून माघारी फिरताना जड होतात. अमरावतीवरुन पन्नास किलोमीटरवरचे परतवाडा सोडले की, दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा दृष्टीस पडतात. पुढे मग विदर्भाचे नंदनवन असलेल्या थंड हवेच्या चिखलदऱ्याचे मनोहारी दर्शन होऊ लागते. मोरपिसाऱ्यासारखी सिल्व्हर ओकची झाडे मोहात पाडतात. वसंत ऋतुत आम्रवृक्षांच्या दुधाळ मोहराचा सुगंध दरवळत राहातो. ऐतिहासिक संदर्भ असलेल्या भीमकुंड, आवाजाचे पाच प्रतिध्वनी ऐकू येणारा पंचबोल, देवी पॉईंट, मोझरी पॉईंट आणि जवळपास आठ नऊशे वर्षाचा इतिहास असलेला अबोल असा उपेक्षित गाविलगड किल्ला आपल्याला साद घालतो.

५) लोणावळा व खंडाळा -

महाराष्ट्राच्या सौंदर्यात ज्या सह्याद्रीने भर घातली आहे त्यातील पाचू म्हणजे लोणावळा आणि खंडाळा. महाराष्ट्रात थंड हवेची जी काही मोजकी ठिकाणे आहेत. त्यात महाबळेश्वरनंतर लोणावळा आणि खंडाळ्याचा समावेश होतो. पुणे-मुंबई महामार्गावर समुद्र सपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर असलेले लोणावळा, गेल्या अनेक दशकांपासून पर्यटकांना भुरळ घालत आहे. लोहगड-विसापूर यांच्या वेढ्याने लोणावळ्याचे महत्त्व वाढले आहे. याशिवाय राजमाची किल्ला खंडाळ्यापासून २० मिनिटांच्या अंतरावर आहे. खूप खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर आणि वाऱ्याचा मंद प्रवाह यामुळे लोणावळ्यातून निसर्गप्रेमींचा पायच निघत नाही. लोणावळा आणि खंडाळा यांच्यात अंतर अगदीच पाच-सहा किलोमीटरचे आहे. डोंगररांगातून जाणाऱ्या नागमोडी पायवाटा, त्या पायवाटांवर असलेली बोरी-जांभळीची झाडे विलक्षण अनुभव देऊन जातात. डोळ्यांसमोर साक्षात उभी निसर्गदेवता आणि जिभेवर रेंगाळणारी बोरांची आंबट पिठूर चव ही डोंगरमाथ्याकडे चालतानाची वैशिष्ट्य. लोणावळ्याच्या जवळच असलेल्या लोहगडाची सफर हा वेगळाच अनुभव आहे.