दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा, विश्वास ठेऊ नये - शिक्षण मंडळ

 दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा पसरली आणि गोंधळात भर पडली.  

Updated: Jun 13, 2020, 07:01 AM IST
दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा, विश्वास ठेऊ नये - शिक्षण मंडळ
प्रतिकात्मक छाया

मुंबई : संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आहे. लॉगडाऊन सुरु आहे. तसेच शैक्षिक नुकसान कसे भरुन काढता येईल यावर विचार सुरु आहे. देशात कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल, यावर राज्य सरकारचा भर आहे. दरम्यान, समाज माध्यमातून शिक्षण आणि निकालाबाबत अफवा पसरविण्यात येत असल्याचे पुढे येत आहे. दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा पसरली आणि गोंधळात भर पडली. यााबबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. ही केवळ अफवा आहे. यावर कोणीही  विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे. 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, अशी समाज माध्यमांवर माहिती फिरत होती. ही एक अफवा आहे. शिक्षण मंडळाकडून अशी कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे निकालासंदर्भांत सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी विश्वास ठेऊ नये, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख महामंडळाच्या अधिकृत इमेलद्वारे, महामंडळाच्या संकेतस्थळावरुन तसेच प्रसिद्ध माध्यमांद्वारे सर्वांना कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (पुणे) सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यातल्या शाळा नियोजित वेळेत सुरु होऊ शकल्या नाहीत. पण आता शाळा जुलैपासून सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आली आहेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे.