मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि हॉल तिकीट रेल्वे स्थानकावर दाखवावे लागणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल बंद आहे. मात्र, अत्याश्यवक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत. दिवसागणित मुंबईसह राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सध्यातरी लोकल सेवा सुरु करण्याचा विचार नाही, असे शासनाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना वेळेत परीक्षा देता यावी, यासाठी विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, अधिस्विकृती असणाऱ्या पत्रकारांनाही लोकलने प्रवास करता येणार आहे. तसेच व्हिडिओ पत्रकारांनाही प्रवासाची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी क्यू आर कोडचा वापर बंधनकारक असणार आहे.