८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना

कोविड-१९चे संकट आणि लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे.  

Updated: Jul 15, 2020, 06:33 AM IST
८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : कोविड-१९चे संकट आणि लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे. काहींच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. तर काहींच्या घेण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान होवू नये म्हणून अनेक शाळा, महाविद्यालयानी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र, केवळ आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

 मनुष्य बळ विकास मंत्रालयानं ऑनलाईन शाळांच्या तासिका आणि अवधी संदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. नियमित शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन शाळा सुरु असल्याने मुलांचा स्क्रीन टाईम वाढत असल्याच्या पालकांच्या तक्रारीनंतर मंत्रालयाने हे निर्देश दिले आहेत. ‘प्रज्ञता’ या नावाने देण्यात आलेल्या निर्देशानुसार पूर्व-प्राथमिक वर्गांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा अवधी ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावा, असे म्हटले आहे.

इयत्ता पहिली ते आठवीसाठी ३० ते ४५ मिनिटांच्या दोन तासिका घेता येतील. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० ते ४५ मिनिटांच्या चार तासिका घेता येतील. कोविड-१९मुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद राहिल्याने २४० दशलक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.

लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्याच्या हेतूने दिशानिर्देश तयार केल्याचे मानव संसाधन आणि विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितले. या निर्देशामुळे मुलांचे शारिरीक मानसिक स्वास्थ्य राखले जाऊन सायबर सुरक्षितताही पाळली जाईल, असंही ते म्हणाले. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी दीक्षा, स्वयंप्रभा, रेडिओ वाहिनी, शिक्षा वाणी यांचा वापर करता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.