अरेरे! आमिरसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ?

सध्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूड इंडस्ट्री ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

Updated: Jun 29, 2020, 11:51 AM IST
अरेरे! आमिरसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ?

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्री अक्षरश: ढवळून निघाली आहे. बॉलिवूडमधील कंपूशाहीमुळे कशाप्रकारे गुणी कलाकारांवर अन्याय होतो, याच्या अनेक कहाण्या समोर आल्या आहेत. एकेकाळी सुपरस्टार्ससोबत पडद्यावर झळकलेले कलावंत विस्मृतीत जाण्याचा अनुभवही बॉलिवूडसाठी नवीन नाही. अशाच एका कलाकाराची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.  'बिग बॉस' फेम डॉली बिंद्रा याने ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे.

पुणे| लॉकडाऊनमुळे कलाकारावर भाजी विकण्याची वेळ

यामध्ये जावेद हैदर Javed Hyder हा कलाकार हातगाडीवर भाजी विकताना दिसत आहे. जावेदने आमिर खानसोबत Aamir Khan 'गुलाम' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता.  मात्र, सध्या बॉलिवूड इंडस्ट्री ठप्प असल्याने जावेद हैदर याच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता आहे.. डॉली बिंद्राने शेअर केलेल्या या Tiktok व्हीडिओत जावेद हैदर हातगाडीवर भाजी विकताना दिसत आहे. या Tiktok व्हीडिओत जावेदने 'दुनिया में जीना है तो...' या गाण्यावर लिप्सिंगही केले आहे. त्यामुळे जावेदवर खरंच परिस्थितीच्या रेट्यामुळे अशी वेळ  आली आहे किंवा तो त्याने केवळ मजेखातर हा व्हीडिओ तयार केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या व्हीडिओमुळे जावेद हैदरसारख्या इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

जावेदने २००९ साली आलेल्या 'बाबर' चित्रपटात काम केले होते. याशिवाय, जेनी और जुजू (२०१२) या मालिकेतही त्याने अभिनय केला होता. बालकलाकार म्हणून जावेदने इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. मात्र, सध्या बेकारीमुळे उदरनिर्वाहासाठी Javed Hyder भाजी विकावी लागत आहे.