सुपरस्टारने सर्वांसमोर अपमान केल्यानंतरही त्याचेच समर्थन करतेय अभिनेत्री, सोशल मीडियावर ट्रोल

दाक्षिणात्य सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांनी अभिनेत्री अंजलीला स्टेजवर सर्वांसमोर धक्का दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर सर्वजण संताप व्यक्त करत असताना अभिनेत्रीनेही पोस्ट केली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 31, 2024, 04:43 PM IST
सुपरस्टारने सर्वांसमोर अपमान केल्यानंतरही त्याचेच समर्थन करतेय अभिनेत्री, सोशल मीडियावर ट्रोल title=

दाक्षिणात्य सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांनी अभिनेत्री अंजलीला स्टेजवर सर्वांसमोर धक्का दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अंजलीचा चित्रपट 'गँग्स ऑफ गोदावरी' च्या प्री-रिलीज कार्यक्रमासाठी नंदामुरी बालकृष्ण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओत नंदामुरी बालकृष्ण स्टेजवर सर्वांसमोर अंजलीला धक्का देऊन मागे ढकलत असल्याचं दिसत आहे. टीका करणाऱ्यांमध्ये दिग्दर्शक हंसल मेहताही आहेत. 

विशेष म्हणजे एकीकडे नंदामुरी बालकृष्ण यांच्यावर टीका होत असताना दुसरीकडे अंजलीने एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याने अंजलीने त्यांचे आभार मानणारी पोस्ट टाकली आहे. अंजलीच्या या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अंजलीने पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

"गँग्स ऑफ गोदावरी प्री-रिलीज कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीने शोभा आणल्याबद्दल मी बालकृष्ण गारू यांचे आभार मानू इच्छिते," असं ती म्हणाली आहे. पुढे म्हटलं आहे की, "मी व्यक्त करू इच्छिते की बालकृष्ण गारु आणि मी नेहमीच एकमेकांबद्दल आदर राखला आहे. आमची खूप पूर्वीपासून चांगली मैत्री आहे. त्यांच्यासोबत पुन्हा स्टेज शेअर करणे खूप छान वाटलं".

कार्यक्रमावेळी नेमकं काय घडलं?

कार्यक्रमावेळी या चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टला मंचावर बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना एका रांगेत उभे राहण्यासाठी सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी अभिनेत्री अंजलीला पुढे जाण्यासाठी सांगत जोरदार धक्का दिला. त्यांच्या धक्क्यामुळे ती पडता पडता वाचली. त्यांचे हे कृत्य पाहून उपस्थित असलेल्या सर्वजण आश्चर्यचकित झाले. मात्र अभिनेत्री अंजलीने हसत हसत यावर दुर्लक्ष केले. तर नंदामुरी यांनीही नंतर मजा मस्ती करत यावर पडदा टाकला. 

गँग्स ऑफ गोदावरी स्टार विश्व सेननेही नंदामुरी बालकृष्ण यांचा बचाव केला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, "चला द्वेषयुक्त भाषण थांबवू आणि नकारात्मकता निवडण्याऐवजी शांतता राखण्यावर लक्ष केंद्रित करूया". 

दरम्यान एकीकडे या कार्यक्रमात नंदामुरी बालकृष्ण यांनी धक्का दिल्यानंतरही अंजली हसत असल्याने काही नेटकऱ्यांनी नाराजी जाहीर केली आहे. गायिका चिन्मयी श्रीपदानेही पोस्ट शेअर करत सुनावलं आहे.  गँग्स ऑफ गोदावरी 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.