Kartik Aaryan : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपली अलिशान घरे भाड्याने दिली आहेत. त्यातून ते दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. त्यात आता अभिनेता कार्तिक आर्यनच्या नावाचाही समावेश झाला आहे. अभिनेत्याने मुंबईतील जुहू येथे 17-18 कोटी रुपयांचे अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. ज्यातून तो आता दर महिन्याला साडेचार लाख रुपये कमावणार आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनचे शेवटचे काही चित्रपट हे फ्लॉप ठरले होते. ज्यामध्ये 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई करू शकला नाही. पण पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग कार्तिक आर्यनने शोधून काढला आहे. स्क्वेअर यार्डनुसार, अभिनेता कार्तिक आर्यनने 42,500 रुपये मुद्रांक शुल्कावर नोंदणी केली आहे. सुमारे 18 कोटी रुपये किमतीचे हे अपार्टमेंट 1912 स्क्वेर फुटमध्ये पसरलेले आहे.
कार्तिकने आईसोबत एक अपार्टमेंट विकत घेतले होते
सिद्धिविनायक प्रेसीडेंसी को-ऑपरेटिव हाउसिंगमधील हे अपार्टमेंट अभिनेता कार्तिक आर्यनने 30 जून 2024 रोजी खरेदी केले होते. या अपार्टमेंटची किंमत 17.8 कोटी रुपये होती. कार्तिक आर्यनने हे अपार्टमेंट त्याची आई माला तिवारी यांच्यासोबत खरेदी केले होते. त्यावेळी कार्तिकने 1.05 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. याशिवाय त्याने नोंदणी शुल्कही भरले होते. ज्याची किंमत 30 हजार रुपये होती.
कार्तिकच्या आईवडीलांनीही विकत घेतली होती प्रॉपर्टी
अभिनेता कार्तिक आर्यनच्या आईवडीलांनीही प्रॉपर्टी खरेदी केली होती. या अपार्टमेंटमध्ये त्यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता. ज्याची किंमत 16.5 कोटी रुपये होती. हा फ्लॅट आठव्या मजल्यावर होता. याच बरोबर जावेद अख्तर यांनी देखील या अपार्टमेंटमध्ये प्लॅट घेतला होता. या अपार्टमेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी फ्लॅट विकत घेतले आहेत. कलाकारांकडून या सोसायटीला चांगली पसंती मिळत आहे.
'भूलभूलैय्या 3' दिसणार कार्तिक आर्यन
अभिनेता कार्तिक आर्यन हा लवकरच 'भूलभूलैय्या 3' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये कार्तिकसोबत तृप्ती डिमरीही दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात विद्या बालन, माधुरी दीक्षित यांचीही भूमिका आहे. 'भूलभूलैय्या 3' या चित्रपटासोबत अभिनेता 'आशिकी 3' या चित्रपटात देखील दिसणार आहे.