मुंबई : हिंदी चित्रपट जगतानं आजवर अनेक कलाकारांना घडताना पाहिलं आहे. कित्येकांना प्रसिद्धी आणि यशाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवलं आहे. अशा कलाकारांच्या यादीत पहिले सुपरस्टार म्हणून गणलं जाणारं नाव म्हणजे, अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचं.
राजेश खन्ना यांचं नाव घेतलं तरी त्यांचे अजरामर चित्रपट, त्यांचा अभिनय आणि भुरळ पाडणारं त्यांचं रुप लगेचच समोर येतं.
सलग 15 सुपरहिट चित्रपट देणारे राजेश खन्ना अशी किमया करणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार ठरले.
खन्ना यांच्या यशामध्ये अनेक गोष्टी जबाबदार होत्या. यामध्ये त्यांची मेहनतही तितकीच महत्त्वाची. पण, तुम्हाला माहितीये का 'जुबली स्टार' राजेंद्र कुमार यांचंही यामध्ये योगदान होतं.
राजेश खन्ना सुपरस्टार झाले, त्यामागे एक अशीही कहाणी सांगितली जाते की त्यांच्या यशामध्ये एका भुताटकी बंगल्याचं योगदान आहे.
हा बंगला प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांनी खरेदी केला होता. राजेंद्र कुमार चित्रपटसृष्टीत जग धरू पाहत असतानाच त्यांची नजर एका बंगल्यावर पडली.
पुढे त्यांनी तो बंगला खरेदी केला. लोकांच्या मते त्या बंगल्यामध्ये वाईट शक्तींचा वास होता. थोडक्यात तो बंगला भुताटकी बंगला याच नावानं ओळखला जात होता.
बंगला खरेदी केल्यानंतर कुमार यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. पण, अचानकच त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. आर्थिक स्थितीही बिघडू लागली.
अखेर राजेंद्र कुमार यांनी हा बंगला अवघ्या 60 हजार रुपयांना विकला. राजेश खन्ना यांनी हा बंगला खरेदी केला.
खन्ना यांनी हा बंगला खरेदी केल्यानंतर तो 'आशीर्वाद' या नावानं ओळखला जाऊ लागला. या बंगल्यात वास्तव्यास आल्यानंतर राजेश खन्ना यांना प्रचंड यश मिळालं.
हे सारं पाहून सर्वच थक्क झाले. त्यांनी डिंपल कपाडिया यांच्याशी नव्या आयुष्याची सुरुवातही याच बंगल्यातून केली.
कालांतराने, राजेश खन्ना यांच्या या बंगल्याला शशिकिरण शेट्टी यांनी 90 कोटींना खरेदी केलं. ज्यानंतर तिथे 4 मजली इमारत उभारण्यात आली.
राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीतील वाईट काळ इथूनच सुरु झाला. अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्धीपुढे खन्ना यांची जादू फिकी पडली.
काहीही असो, आजही राजेश खन्ना हे 'अमर प्रेम', 'प्रेम कहानी', 'प्रेम नगर', 'दुश्मन', 'आपकी कसम', 'कटी पतंग', 'नमक हराम', 'हाथी मेरे साथी', 'सच्चा-झूठा', 'रोटी', 'अजनबी', 'कुदरत', 'अगर तुम न होते', 'हम दोनों', 'मेहबूबा', 'छैला बाबू', 'अवतार', 'आखिर क्यों', 'सौतन' या सुपरहिट चित्रपटांमुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.