मुंबई : एकिकडे गणपती बाप्पाच्या येण्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना एका सेलिब्रिटीच्या आयुष्यात आनंदाची बरसात झाली आहे. तिच्या आनंदामागचं कारणही तसंच आहे. मॉडेल आणि अभिनेत्री ब्रूना अब्दुल्ला हिने एका मुलीला जन्म दिला आहे. इतकच नव्हे, तर तिने मुलीचं सुंदर असं नावही ठेवलं आहे. इसाबेला असं तिचं नाव आहे.
रविवारी ब्रुनाने सोशल मीडियावर तिच्या मुलीचा फोटो शेअर केला. मुलीच्या जन्माची तारीख लिहित तिचं नाव ब्रुनाने या फोटोसोबत सर्वांसमोर आणलं. 'माय नेम इज....', असं लिहित तिने हा फोटो पोस्ट केला. 'माझ्या कुटुंबातील नव्या सदस्याची, इसाबेलाची भेट घडवून आण्यासाठी मी फार उत्सुक आहे..... ', असं कॅप्शन तिने या फोटोसोबत लिहिलं.
तिचा हा अंदाज अनेकांचीच मनं जिंकून गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रुनाने मे महिन्यात Allan Frase याच्याशी लग्नगाठ बांधली होती. ज्यानंतर आता या जोडीच्या जीवनात आनंदाची उधळण करणाऱ्या त्यांच्या लाडक्या चिमुरडीचं आगमन झालं आहे.
काही दिवसांपूर्वीच ब्रुनाच्या गरोदरपणाच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गरोदरपणाच्या काळात तिने कायमच व्यायाम, आहार या गोष्टींची काळजी घेत इतरही गरोदर महिलांपुढे आदर्श ठेवला होता.