मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया (Alia Bhatt) आणि पती रणबीर कपूरचा (Ranbir Kapor) 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची (Boycott Brahmastra) मागणी सातत्याने होत आहे. आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तयार झालेला हा चित्रपटाची प्रतिक्षा प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून सगळ्यांनाच अंदाज आला आहे की मौनी रॉय या चित्रपटाची खलनायक आहे. मात्र आता या चित्रपटाची कथा सोशल मीडियावर लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या चित्रपटाची खरी खलनायक मौनी रॉय नसून आलिया भट्ट असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटाविषयी अनेक गोष्टीं समोर आल्या आहेत. ब्रम्हास्त्रच्या कथेविषयी जे दावे करण्यात येत आहेत, ते केवळ हास्यास्पद आहे. चित्रपटात रणबीर अग्निची सुपरपावर असलेल्या शिवाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये, अमिताभ बच्चन यांची भूमिका शिवाला त्याच्या सुपरपावरची असल्याचे पटवून देतात. तर मौनी ही खलनायकाच्या भूमिकेत दिसत असून ब्रह्मास्त्र मिळविण्यासाठी तिच्या सैन्यासोबत हल्ला करताना दिसत आहे. आलियाची भूमिका ही एका शांत मुलीची असून ती रणबीरच्या प्रेमात पडते. पण आता काही लोकांचे म्हणने आहे की आलिया प्रत्यक्षात व्हिलन असून ती शिवासाठी हनी ट्रॅप म्हणून आली आहे.
सोशल मीडियावर सुरु असलेल्या दाव्यानुसार, या चित्रपटात खलनायक ईशा म्हणजेच आलिया भट्ट आहे. तिला 'अग्नि अस्त्र' म्हणजेच शिवाच्या मदतीने इतर सर्व शस्त्रांपर्यंत पोहोचायचे आहे. दुसरीकडे काही नेटकरी आहेत जे म्हणत आहेत की आलियाकडे देखील एक अस्त्र आहे आणि ते चित्रपटाच्या शेवटी समोर येणार आहे.
'ब्रह्मास्त्र'मधील दीपिका पदुकोणच्या पाहूण्या कलाकार म्हणून असलेल्या भूमिकेचीही चर्चा आहे. तिची भूमिका काय असेल याबाबत निर्मात्यांनी खुलासा केलेला नसला तरी दीपिका या चित्रपटात 'जल अस्त्र'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तर अमिताभ बच्चन कथेत शिवाचे गुरू आहेत.
'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख खानची देखील पाहूण्या कलाकाराची भूमिका आहे. टीझर रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाची कथा लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानुसार 'ब्रह्मास्त्र'ची सुरुवात शाहरुख खानच्या भूमिकेने होणार आहे. या चित्रपटात शाहरुख 15-20 मिनिटांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे जो ऊर्जा स्त्रोताचा शोध घेत आहे. हा ऊर्जास्रोत म्हणजे 'ब्रह्मास्त्र'.