Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन यांच्यात घट्ट नातं आहे. मुलीविषयी असलेलं प्रेम अमिताभ बच्चन यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लाडक्या मुलीला सर्वात महागडं गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चनला त्यांच्या जुहू येथील प्रतिक्षा नावाचा बंगला दिला आहे. हा बंगला 50 कोटींचा असल्याचे म्हटलं जात आहे. 8 नोव्हेंबर 2023 रोजी यासंदर्भातील कागदोपत्री व्यवहार करण्यात आले. मात्र याबाबत बच्चन कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुंबईतील जुहू येथील बंगला 'प्रतीक्षा' मुलगी श्वेता बच्चन नंदा हिला सुपूर्द केला. विठ्ठलनगर हौसिंग सोसायटीमध्ये बांधलेला हा बंगला 674 स्क्वेअर मीटर आणि 890.47 स्क्वेअर मीटर अशा दोन प्लॉटमध्ये बांधला आहे. दोन्ही भूखंडांसह या मालमत्तेची एकूण किंमत 50.63 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या बंगल्यात आपल्या कुटुंबासह राहत होते. आता श्वेता बच्चन नंदा यांचे नाव देण्यात आले आहे.
दुसरीकडे आता या प्रॉपर्टीच्या वाटपावरुन अमिताभ यांचे जुने वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द खूप मोठी आहे. जवळपास सहा दशकांच्या या काळात अमिताभ यांनी कोटींची संपत्ती जमा केली आहे. काही वर्षांपूर्वी, 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर त्यांच्या मृत्यूनंतर या संपत्तीचे काय होईल हे सांगितले होते. माझ्या मृत्यूनंतर ही कोट्यावधी रुपयांची संपत्ती माझी दोन मुले अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांच्यामध्ये समान प्रमाणात विभागली जाईल, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं.
याआधी अमिताभ बच्चन यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारेही माहिती दिली होती. 'जेव्हा मी मरेन, तेव्हा मी या जगात जी काही संपत्ती सोडेन ती माझ्या मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटली जाईल,' असे अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं.
अमिताभ बच्चन यांची संपत्ती
अमिताभ बच्चन यांचे मुंबईत जलसा आणि जनक असे आणखी दोन बंगले आहेत. बच्चन आपल्या कुटुंबासह जलसामध्ये वर्षानुवर्षे राहत आहेत. त्याची एकूण संपत्ती 3300 कोटी रुपये आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, बिग बींच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत हा चित्रपट आहे. ते त्यांच्या एका चित्रपटासाठी 6 कोटी रुपये मानधन घेतात.