मुंबई : अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे बरेच सिनेमे सुपरहिटही ठरले. दोघांनी पडद्यावर केलेली जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
दोघांनी ‘राम लखन’, ‘तेजाब’, ‘बेटा’ आणि ‘पुकार’ सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. आता पुन्हा एकदा ही मोहिनी घालणारी जोडी एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही जोडी लवकरच एकत्र बघायला मिळू शकते. दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी त्यांच्या ‘धमाल’ या सिनेमाचा तिसरा सिक्वलसाठी माधुरी दीक्षितला विचारणा केली आहे. तिला हा रोल अनिल कपूरच्या अपोझिट ऑफर करण्यात आलाय. ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’नंतर आता या सिनेमाचं टायटल ‘टोटल धमाल’ असं असेल. आतापर्यंत या सिनेमांच्या सीरिजमध्ये संजय दत्त, अरशद वारसी, रितेश देशमुख, आशिष चौधरी आणि जावेद जाफरी यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ महिन्यांपूर्वी इंद्र कुमार यांनी माधुरीला या रोलसाठी संपर्क केला. मात्र अजून तरी माधुरीने त्यावर रिप्लाय दिला नाहीये. अजूनही त्यांची बोलणी सुरू आहे. जर माधुरीने या सिनेमासाठी होकार दिला तर ‘गुलाल गॅंग’नंतर तिचा हा दुसरा सिनेमा असेल. जर अनिल कपूरनेही या सिनेमासाठी होकार दिला तर तब्बल १६ वर्षांनी ही कमाल जोडी एकत्र येईल.