मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला काही दिवसांपूर्वीच एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अटक केली. आर्यनच्या सुटकेसाठीचे शक्य ते सर्व प्रयत्न त्याच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहेत. पण, तरीही न्यायालयानं मात्र आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळं त्याच्यापुढच्या अडचणी काही केल्या संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत.
दरम्यान, एकिकडे आर्यनच्या संकटांत वाढ होत असतानाच दुसरीकडे त्याच्या मित्रांकडून आणखी एक खुलासा करण्यात आल्याचं कळत आहे. सध्या आर्यन अटकेत नसता, तर तो अमेरिकेत मित्रांसमवेत रोड ट्रीपचा आनंद घेत असता. पण, आता मात्र त्याचे हे सर्व बेत रद्दच झाल्यात जमा आहेत.
आर्यनच्या मित्रांपैकीच एकानं सांगितल्यानुसार कलाविश्वातील मित्रांपेक्षा इतर मित्र बनवण्याकडेच आर्यनचा कल दिसतो. आर्यन सध्या कोठडीत असल्यामुळे अनेकांनीच चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कुटुंबासमवेतच त्याच्या मित्रपरिवाराचाही यात समावेश आहे. (aryan khan arrest)
तिथं परदेशात असणारी आर्यनची बहीण, शाहरुख खानची मुलगी सुहाना हिदेखील सदर प्रकरणाचं गांभीर्य पाहता सातत्यानं कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. आर्यनपुढे आलेलं संकट पाहता शाहरुखनंही त्याच्या आगामी प्रोजेक्टची कामं पुढे ढकलली आहेत. आर्यन या सर्व प्रकरणातून मोकळा होताच तो कामासाठीच्या तारखा देणार असल्याचं म्हटलं जात आहे.