close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'भारत' दुसऱ्या क्रमांकावर

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मुसंडी मारली आहे.

Updated: Jun 6, 2019, 11:29 AM IST
पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'भारत' दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर 'भारत' हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मुसंडी मारली आहे. चाहत्यांमध्ये असणारं सलमानचं वेड आणि त्याला ईदचं निमित्त याचा फायदा चित्रपटाला झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल ३० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे रमजानच्या दिवशी सलमानने त्याच्या चाहत्यांना चांगलीत ईदी दिली आहे. आता येत्या दिवसात चित्रपट किती रूपयांची मजल मारतोय हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहता, चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

यंदाच्या वर्षी पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांपैकी सलमानचा 'भारत' चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकावर अभिनेता अमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणारा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट आहे. 'ठग्स...'ने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी ५२ कोटी रूपयांचा गल्ला जमवत मजल मारली होती. 

गेल्या काही वर्षांपसून सलमानचा प्रत्येक चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होतो. २००९ साली प्रभुदेवा दिग्दर्शित 'वॉन्टेड' चित्रपटापासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटापर्यंत सलमानचे सर्व चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले आहेत जे मोठ्या प्रमाणात यशस्वीसुद्धा ठरले आहेत. त्यामुळे ईद आणि सलमानचे चित्रपट हे समीकरणही आता चाहत्यांच्या सवयीचं झालं आहे.