मुंबई : कलाविश्वातील मुख्य प्रवाहात काम करताना अनेकदा अधिक वजन असणाऱ्या लोकांना मनोरंजनात्मक भूमिका देण्यात येतात. अनेकदा अशा भूमिकांना लोक अधिक गंभीरतेनेही घेत नाहीत. चित्रपटातही अशा वजनदार लोकांना अधिकदा मजेदार घटक म्हणून पात्र साकारावे लागते. पण बंगळुरूमधील एक थिएटर ग्रुप अशा वजनदार लोकांसाठी पुढे आला आहे. समाजामध्ये अधिक वजन असणाऱ्या लोकांबाबतची धारणा बदण्यासाठी हा ग्रुप पुढे सरसावला आहे.
अनुराधा एच. आर यांनी दोन वर्षांपूर्वी एक फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ प्लस साइज लोकांना त्यांच्या थिएटर ग्रुपमध्ये सहभागी होण्याबाबत सांगितलं होतं. सुरुवातीला त्यांच्या या थिएटर ग्रुपमध्ये कोणीही सहभागी झालं नाही. पण त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरुच ठेवले. अखेर अनेक प्रयत्नांनंतर जुलै २०१७ मध्ये १५ प्लस साइज लोकांनी त्यांच्या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला आणि या १५ जणांसोबत त्यांनी 'बिग फॅट' कंपनीची सुरुवात केली.
अनुराधा यांनी सांगितलं की, अनेकदा अधिकतर लोकांना त्यांच्या वजनामुळे, प्लस साइजमुळे लाजिरवाण्या प्रकाराला सामोरं जावं लागतं. त्या गेल्या २० वर्षांपासून थिएटर करत आहेत. पण त्यांच्या वजनामुळे त्यांना कधीच मुख्य भूमिका दिली गेली नसल्याची खंत त्यांनी सांगितली.
त्यांच्या ग्रुपमधील अनेकांना या भेदभावाचा सामना करावा लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पण आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून अनुराधा यांना सिद्ध करायचं आहे की, केवळ प्लस साइजमुळे अशा लोकांना कोणीही टाळू शकत नाही.
अनुराधा सध्या बिग फॅट कंपनी अंतर्गत त्यांच्या पहिल्या नाटकाची तयारी करत आहेत. बिग फॅट कंपनीच्या माध्यमातून त्यांना प्लस साइज असलेल्या लहान मुलांपर्यंतही पोहोचायचे आहे. लठ्ठ असलेल्या अनेक लहान मुलांची अनेकदा मस्करी केली जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र, बिग फॅट कंपनीच्या माध्यमातून अशा मुलांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. 'बिग फॅट' कंपनी लठ्ठ, प्लस साइज लोकांसांठी नवा आशेचा किरण ठरत आहे.