Bigg Boss 17 Grand Finale: विजेता होणार लखपती, किती पैसे मिळणार?

बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचा अंतिम सोहळा आज रंगणार आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक विजेत्याच्या शर्यतीत आहेत. 

Updated: Jan 28, 2024, 01:19 PM IST
Bigg Boss 17 Grand Finale: विजेता होणार लखपती, किती पैसे मिळणार? title=

Bigg Boss 17 Grand Finale : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कडे पाहिले जाते. बिग बॉस हा कार्यक्रम कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बिग बॉस या कार्यक्रमाच्या हिंदी पर्वाला 2006 मध्ये सुरुवात झाली. सध्या बिग बॉस हिंदीचे 17 वे पर्व सुरु आहे. बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचा अंतिम सोहळा आज रंगणार आहे.  बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक विजेत्याच्या शर्यतीत आहेत. बिग बॉसच्या विजेत्याला बक्षीस म्हणून काय मिळणार याची आपण माहिती घेणार आहोत. 

कधी कुठे पाहता येणार सोहळा?

बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज 28 जानेवारी 2023 रोजी  रंगणार आहे. हा सोहळा तुम्हाला जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर पाहता येणार आहे. बिग बॉस 17 चा महाअंतिम सोहळा जवळपास 6 तासांचा असणार आहे. हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. 

विजेत्याला किती पैसे मिळणार?

बिग बॉसच्या 17 व्या पर्वाची ट्रॉफी जिंकण्यासाठी पाच स्पर्धकांमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचे टॉप पाच स्पर्धक ठरले आहेत. बिग बॉसच्या विजेत्याची निवड मतदान प्रक्रियेद्वारे होणार आहे. एबीपी लाईव्ह या हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस 17 च्या विजेत्यावर मोठ्या प्रमाणात बक्षीसांचा वर्षाव केला जाणार आहे. बिग बॉसच्या विजेत्याला ट्रॉफीसोबत एक नवीकोरी कार भेट म्हणून दिली जाणार आहे. त्यासोबतच त्याला 30 ते 40 लाख रुपयेही मिळतील. 

बिग बॉसच्या 17 व्या पर्वात सहभागी झालेले सर्व कलाकार पुन्हा सहभागी होणार आहेत. यातील काही कलाकार हे मंचावर नृत्यही सादर करतील. तर रात्री 12 च्या सुमारास बिग बॉसचा होस्ट अभिनेता सलमान खान हा बिग बॉस 17 चा विजेता कोण, याची घोषणा करेल. 

कोण जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी?

दरम्यान प्रत्येक पर्वाप्रमाणे यंदाच्या बिग बॉस पर्वातही भांडण, प्रेम प्रकरण, नात्यांमधील दुरावा, मैत्री या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. या पर्वात अंकिता लोखंडे-विकी जैन यांच्यातील वाद, अभिषेक-ईशा-समर्थ यांचा लव्ह ट्रायअँगल, मुनव्वर फारुकीवर 'टू-टाईमिंग'चा आरोप यांसह अनेक वादग्रस्त गोष्टी पाहायला मिळाल्या. सध्या सोशल मीडिया ट्रेंडनुसार, बिग बॉस 17 चा विजेत्याच्या शर्यतीत मुनव्वर फारुकी आणि अंकिता लोखंडे ही दोन नाव आघाडीवर आहेत. त्यामुळे यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.