मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा, अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC)ने मोठं पाऊल उचललं आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींच्या इमारतींमध्ये BMCने कोविड चाचणी शिबीर लावली आहेत.
करीना आणि अमृता यांची कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर, बीएमसीने दोन्ही अभिनेत्रींवर कोविडच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. याशिवाय आता बीएमसीने आरोप केला आहे की, करीनाचं कुटुंब त्यांना साथ देत नाहीये. वारंवार चौकशी केल्यानंतर त्यांनी सैफ अली खान मुंबईत नसल्याचं उघड केलं.
सैफ गेल्या आठवड्यापासून मुंबईत नाही
बीएमसीच्या सूत्रांनी सांगितलं की, कुटुंब उघड करत नाहीये आणि त्यांना सहकार्य करत नाही. तिला वारंवार विचारल्यावर करीना कपूरच्या कुटुंबीयांनी बीएमसीला सांगितले की, सैफ अली खान गेल्या एक आठवड्यापासून मुंबईत नाही. मात्र, तो कधी परतणार याबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही. त्याच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही.
बीएमसीच्या सूत्रांनी पुढे सांगितलं की, सध्या कोणत्याही सेलिब्रिटीने परदेशात प्रवास केल्याची हिस्ट्री नाही, त्यामुळे याक्षणी कोणतेही जीनोम सिक्वेन्सिंग केले जाणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सध्या सुरू आहे. आरोग्य विभागाची टीम कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत आहे. अनेक संघ तयार करण्यात आले आहेत. संघाला काही संशयास्पद आढळल्यास किंवा गरज भासल्यास जीनोम सिक्वेन्सिंगबाबत निर्णय घेतला जाईल.
या सगळ्यावर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, ''करोनाचे संकट गेलं नसताना निष्काळजीपणे वागणं करीनाला शोभत नाही. करीनाच्या घरी तिची दोन मुलं आहेत. ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीला करीनाने हजेरी लावली होती त्यामुळे त्या पार्टीला हजर असणाऱ्यांशी आम्ही संपर्क साधत आहोत' त्या पुढे म्हणाल्या की, '. जे लाइमलाइटमध्ये आहेत, त्यांना करोनाची भीती का वाटत नाही? आम्ही अशा लोकांविरोधात करोनाचे नियम मोडल्यामुळे का कठोर कारवाई करु नये?'