म्हणून कलाविश्वाने मानले मोदींचे आभार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवन येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती

Updated: Dec 23, 2018, 01:08 PM IST
म्हणून कलाविश्वाने मानले मोदींचे आभार  title=

मुंबई : 'मेट्रो ५' च्या भूमिपूजनासाठी मुंबई- पुणे दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवन येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यातीलच एक महत्त्वाचा मुद्दा होता चित्रपटाच्या तिकीटांवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीचा. 

मुंबईत झालेल्या या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून एकूण ३३ वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. ज्यामध्ये टेलिव्हिजन, टायर, मॉनिटर आणि चित्रपटांच्या तिकीटांवरील कर कमी करण्य़ात आले. 

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर अनेक बी- टाऊन कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीच्या पोस्ट लिहित पंतप्रधानांचे आभार मानले. अजय देवगण, अक्षय कुमार, आमिर खान आणि करण जोहर यांनी ट्विट करत मोदींचे आभार मानले. 'चित्रपट सृष्टीची हाक अखेर ऐकली आहे...', असं म्हणत अजय देवगणने ट्विट केलं. तर, जीएसटीसंदर्भात अतिशय कमी वेळात घेण्यात आलेल्या या निर्णयाचं खिलाडी कुमारनेही मोठ्या मानने स्वागत केलं आहे. 

राजभवन येथे पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सदस्यांमध्ये प्रोड्यूसर्स गिल्डच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सिद्धार्थ रॉय कपूर आणि सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या प्रसून जोशी यांच्यासह रितेश सिधवानी, रॉनी स्क्रूवाला, करण जोहर, राकेश रोशन यांची उपस्थिती होती.