मुंबई : आपल्या सवयीच्या वर्तुळातून बाहेर पडत कायमच प्रयोगशीलतेच्या वाटेवर चालणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता अक्षय कुमार याच्या नावाचा उल्लेख केला जातो. चित्रपटांची निवड म्हणू नका किंवा मग त्याने राबवलेला एखादा उपक्रम म्हणू नका. तो कायमच चाहत्यांना थक्क करत असतो. हेच सत्र सुरु ठेवत खिलाडी कुमारने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत, त्याने 'लक्ष्मी बॉम्ब' या आगामी चित्रपटातील तो साकारत असलेल्या भूमिकेवरुन पडदा उचलला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा फोटो शेअर केला. 'नवरात्रोत्सव म्हणजे तुमच्यात दडलेल्या देवीचा, शक्तीचा उत्सव. अशा या सणाच्या औचित्याने मी लक्ष्मी रुपातील माझा हा फोटो तुमच्या भेटीला आणला आहे' असं कॅप्शन लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला.
लक्ष्मीच्या भूमिकेसाठी आपण उत्सुक आहोत, पण सोबतच एक प्रकारचं दडपणी आपल्या मनावर असल्याचं सांगत साचेबद्ध गोष्टींच्या शेवटालाच खऱ्या आयुष्य़ाची सुरुवात होते असा सुरेख संदेशही त्याने दिला आहे.
अक्षयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो स्त्रीरुपात दिसत आहे. लाल रंगाची साडी नेसलेल्या खिलाडी कुमारची नजर कोणा एका गोष्टीवर रोखलेली आहे. त्याच्या मागे एक अष्टभूजा देवी दिसत आहे, जिने असुराचा वध केला आहे. देवीचं हे रुप आणि तिच्या पुढे असणारा अक्षय असा एकंदर फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे.
राघव लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात खिलाडी कुमारसोबतस अभिनेत्री किआरा अडवाणीसुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे. तामिळ चित्रपट 'कांचना'चा रिमेक असणाऱ्या या चित्रपटात अक्षय मध्यवर्ती भूमिकेत आहे. ज्याला एका तृतीयपंथी व्यक्तीच्या आत्म्याने झपाटलेलं असतं असं चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची ही आगळीवेगळी भूमिका पाहणं चाहत्यांसाठी परवणी ठरणार आहे.