राजकारणात पदार्पणाच्या चर्चा रंगताच अक्षयचा मोठा खुलासा

कलाविश्वातही राजकारणाचे वारे

Updated: Apr 22, 2019, 04:29 PM IST
राजकारणात पदार्पणाच्या चर्चा रंगताच अक्षयचा मोठा खुलासा title=

मुंबई : संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकांचे वारे वाहत असतानाच कलाविश्व यापासून दूर राहिल हे कसं शक्य आहे. कलाविश्वातही राजकारणाचे वारे वाहत आहेत, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकविषयी असो किंवा कोणत्या पक्षाला मत द्या अथवा देऊ नका यावरुन झालेल्या दुफळीविषयी असो. लोकशाही राष्ट्र असणाऱ्या या देशात आणखी एका अभिनेत्याचं नाव राजकीय वर्तुळात प्रकाशझोतात आलं. तो अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. 

'सुर्यवंशी' या आगामी चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती देणाऱ्या खिलाडी कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ट्विट केलं. ज्या ट्विटमध्ये त्याने आपण अगदी नव्या क्षेत्रात पदार्पण करत असल्याचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपण उत्साही असल्यासोबतच मनावर एक प्रकारचं दडपण असल्याचंही त्याने ट्विट करत म्हटलं. 

अक्षयने या ट्विटमध्ये तो नेमकं कशाविषयी बोलत आहे याची पुसटशी कल्पनाही दिली नाही, त्यामुळे मग तो राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे ट्विट लक्षवेधी ठरलं. किंबहुना तो राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हणत काहींनी त्याला शुभेच्छाही दिल्या. आपल्याविषयी होणाऱ्या या चर्चा पाहता अखेर त्याने एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. 

आपल्या एका ट्विटला मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद पाहून मी भारावलो आहे. पण, मी कोणत्याच प्रकारच्या निवडणुकीत सहभागी होत नाही आहे, असं तो या ट्विटच्या माध्यमातून म्हणाला आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे निदान सध्यातरी राजकारणापासून त्याने दूर राहणंच पसंत केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

राजकारण आणि राजकीय भूमिकांविषयी सांगावं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजनांना आणि उपक्रमांना खिलाडी कुमारने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात तो या नव्या क्षेत्रात एका नव्या कारकिर्दीची सुरुवात करणार का, हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल.