'मी उध्वस्त झालोय'; लाडक्या 'अकबर'च्या एक्झिटने बिग बींना हादरा

कलाविश्वावर शोककळा.... 

Updated: Apr 30, 2020, 10:27 AM IST
'मी उध्वस्त झालोय';  लाडक्या 'अकबर'च्या एक्झिटने बिग बींना हादरा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी कलाविश्वात एक काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवासपासून त्यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांच्यावर परदेशात उपचारही सुरु होते. पण, अखेर या आजाराशी सुरु असणारी त्यांची झुंज संपली. 

रुपेरी पडद्यावर कित्येक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या हरहुन्नरी मित्राच्या निधनाचं वृत्त बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आणलं. 

'अमर अकबर एँथनी' या चित्रपटातील त्रिकुटामधील 'अमर' म्हणजेच विनोद खन्ना आणि आता 'अकबर' म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर यांचंही निधन झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांना धक्का बसला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या ट्विटमधून हेच स्पष्ट होत आहे. एका अतिशय खास आणि तितक्याच जवळच्या मित्राच्या निधनामुळे आपण उध्वस्त झाल्याची भावना व्यक्त करत या ऑनस्क्रीन 'एँथनी'ने दु:ख व्यक्त केलं. 

'तो गेला आहे.... ऋषी कपूर गेला आहे. नुकतंच त्याचं निधन झालं. मी उध्वस्त झालो आहे...', असं ट्विट त्यांनी केलं. सुपरस्टार रजनीकांत यांनीही ट्विट करत आपल्या अतिशय चांगल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. तर आपल्या कुटुंबाशी ऋषी कपूर यांनं नेमकं नातं कसं होतं हे सांगत या धक्कादायक वृत्तावर य़अभिनेता अक्षय कुमार व्यक्त झाला. 

 

फक्त कलाविश्वातूनच नव्हे, तर राजदकीय वर्तुळातूनही ऋषी कपूर यांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यावर अनेकांनी या ज्येष्ठ अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली.