पाहा, चाहत्यानं असं काही केलं, की अमिताभ बच्चन यांनाच घ्यावी लागली त्याची भेट

ऐसी दिवानगी देखी नही कभी.... 

Updated: Oct 22, 2021, 01:21 PM IST
पाहा, चाहत्यानं असं काही केलं, की अमिताभ बच्चन यांनाच घ्यावी लागली त्याची भेट
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मागील कित्येक दशकं चाहत्यांच्या मनावर आणि हिंदी कलाविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये दिवसागणिक भर पडत आहे. कोणत्याही पिढीच्या व्यक्तीला या कलाकाराचं नाव, त्यांचा चेहरा कायमच आपलासा वाटतो. काहींसाठी अमिताभ बच्चन आदरस्थानी असतात. तर, काहींसाठी जणू एक चमत्कार. 

कायमच आपल्या कलाकृतींनी चाहत्यांना भारावणाऱ्या या महानायकाला एका चाहत्याच्याच कृतीने भारावून टाकलं आहे. तेही इतकं, की त्यांनी स्वत:च या चाहत्याची भेट घेत याबाबतचा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. 

काही फोटो पोस्ट करत एका व्यक्तीची भेट घेणारे बिग बी या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितात, 'या व्यक्तीनं त्यांची संपूर्ण कार माझ्या चित्रपटातील डायलॉग्सनं भरली आहे. त्यांच्या शर्टवर माझ्या चित्रपटाची नावं आहेत. त्यांच्या कारचं दार तुम्ही उघडता तेव्हा कारमधील साऊंड सिस्टीम माझे डायलॉग्स वाजवते. हे खरंच भारावून टाकणारं आहे. त्यांनी नुकतंच हे वाहन खरेदी केली आहे. पण, मी सही करत नाही, तोवर त्यांनी ही कार चालवलीही नाही.... मी सही केलीये.... '

बच्चन यांनी चाहत्याची ही करामत सर्वांच्याच भेटीला आणल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये अनेक फॉलोअर्सनी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांच्याच चित्रपटांची डायलॉगबाजी करत या क्षणांचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं. 

चाहत्यांच्या प्रेमाचा अमिताभ बच्चन यांनी स्वीकार करत कायमच त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं स्थान सर्वांपुढे आणलं आहे. एक कलाकार म्हणून आपण ज्या चाहत्यांच्या बळावर मोठं झालो आहोत त्यांना कायमच प्राधान्यस्थानी ठेवण्याचा आदर्शच त्यांनी सर्वांना दिला आहे.