मुंबई : समाज माध्यमं अर्थात सोशल मीडियाची सहज उपलब्धता अनेक गोष्टींना वाव देत आहे. अशा परिस्थितीमध्ये फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. बॉलिवूड कलाकार आणि कोणत्याही क्षेत्रातील सेलिब्रिटी, काही ओळखीचे चेहरे यांचे फोटो तुलनेने व्हायरल होण्याचं प्रमाण अधिक.
अशा या व्हायरल प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी एक फोटो समोर आला होता. हा फोटो जरा जास्तच लक्ष वेधणारा ठरला, कारण त्यामध्ये दिसणाऱ्या दोन व्यक्ती.
एका जुन्या फोटोमध्ये महानायक अमिताभ बच्चन कोणालातरी शेक हँड करत आहेत.
अनेकांच्या मते ही समोरची व्यक्ती म्हणजे दाऊद आहे. याचा काही पुरावा नाही, पण त्या व्यक्तीचा चेहरा हा बऱ्याच अंशी दाऊदशी मिळता जुळता आहे. ज्यामुळे बिग बी खरंच दाऊदला भेटले? असाच प्रश्न फोटो पाहून उपस्थित झाला.
दाऊदचे कलाकारांशी असणारे संबंध ही काही नवी बाब नाही, ज्यामुळं बिग बींचा हा फोटोही नजरा वळवून गेला.
ज्यानंतर खुद्द अभिषेक बच्चन यानंच वास्तव समोर आणलं. विनाकारण आपल्या वडिलांवर होणारी टीका पाहता, अभिषेकनं त्यामध्ये दिसणारी व्यक्ती ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असल्याचं स्पष्ट केलं.
मुळातच हा फोटो अतिशय जुना आहे. ज्यामुळं तो धुसरच दिसत आहेत. त्यातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणारे चव्हाण ज्या वेषात आहेत ते पाहून अनेकांचीच फसगत झाली आणि चर्चांनी जोर धरला.
ज्या व्यक्तीनं हा फोटो व्हायरल केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळाल्यानंतर त्या व्यक्तीनं आपली पोस्टही डिलीट केली होती.