मुंबई : रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या बऱ्याच जोड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अशा काही जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी.
विविध भूमिकांना न्याय देत श्रीदेवी आणि अनिल कपूर यांनी अनेक चित्रपट खऱ्या अर्थाने गाजवले. फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर खासगी आयुष्यातही त्य़ांचं नातं अतिशय सुरेख होतं.
'श्री', या अनिल कपूर यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजेच बोनी कपूर यांची पत्नी. त्यामुळे त्यांच्यासोबतचं नातं नेहमीच खास होतं. पण, एक अभिनेत्री म्हणून त्यांची आपल्या चित्रपट विश्वातील कारकिर्दीत अतिशय महत्त्वाची भूमिका आहे, अनिल कपूर यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केलं आहे.
'एक अभिनेत्री म्हणून आपण श्रीदेवी यांचा नेहमीच आदर केला. त्या जेव्हा समोर यायच्या तेव्हा आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होत, पाया पडायचो' असं अनिल कपूर यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या अशा वागण्यामुळे श्रीदेवी यांना अनेकदा संकोलच्यासारखं होत असल्यामुळे कपूर यांना त्या नेहमीच असं न करण्यास सांगत.
श्रीदेवी यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत कपूर म्हणाले, 'त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं हा नशिबाचाच भाग आहे. त्यांच्या येण्याने रुपेरी पडद्यावर एक वेगळ्याच प्रकारची जादू व्हायची. त्यामुळे त्यांच्या आठवणीक दु:ख व्यक्त करण्यापेक्षा एक संपन्न अभिनेत्री म्हणून त्यांचा वावर, त्यांना मिळालेलं प्रेम या गोष्टींविषयीचा आनंद साजरा केला पाहिजे.'
'मिस हवाहवाई' म्हणून हिंदी कलाविश्वात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या लोकप्रियतेविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिनय आणि नृत्यशैलीच्या बळावर त्यांनी या कलाविश्वात आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं. ग्लॅमरची परिभाषा आणि त्यामध्ये आपलं असं एक महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्रीदेवी या आज आपल्यात नसल्या तरीही अनेक भूमिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मात्र त्या कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील.