close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निकशी लग्नगाठ बांधल्यानंतर 'देसी गर्ल'नं केला नावात बदल

 प्रियांकाचा स्वागत सोहळा अधिक खास ठरला तो म्हणजे पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे

Updated: Dec 7, 2018, 03:52 PM IST
निकशी लग्नगाठ बांधल्यानंतर 'देसी गर्ल'नं केला नावात बदल

मुंबई : #PriyankaNickWedding  'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा खऱ्या अर्थाने आता परदेसी झाली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हिंदी कलाविश्वात नारुपास आलेल्या या अभिनेत्रीने अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत लग्नगाठ बांधली. भारतातच जोधपूर येथे तिचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. 

प्रियांकाच्या स्वप्नवत विवाहसोहळ्यानिमित्त चाहत्यांमध्येही आनंदाची लाट पाहायला मिळाली. जीवनात एका नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने लग्नानंतर आपल्या नावात एक बदल केला आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा बदल सर्वांसमोर आणला. 'मिसेस जोनास',  म्हणून काही दिवसांपूर्वीच हुडी घातलेला तिचा एक फोटो व्हायरल झाला होता.  त्यानंतर आता तिने थेट आपल्या नावातच एक बदल केला आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर तिने आपल्या नावामध्ये आता निकचं आडनाव जोडलं आहे. 

प्रियांका चोप्रा जोनास, अशी तिची नवी ओळख एका वेगळ्या अंदाजात जगासमोर आणत या 'क्वांटिको गर्ल'ने सर्वांचच लक्ष वेधलं. तिचा हा अंदाज चाहत्यांचीही दाद मिळवून गेला. 

प्रियांका आणि निक यांचा ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीत विवाहसोहळा पार पडला होता. जोधपूरमध्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत प्रियांकाने लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर दिल्ली येथे तिच्या लग्नानिमित्त एका स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रियांकाचा स्वागत सोहळा अधिक खास ठरला तो म्हणजे पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे. 'देसी गर्ल' आणि तिचा पती निक जोनास या नवविवाहित जोडीला शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत हजेरी लावली होती.