शौर्याची नवी परिभाषा सांगतोय अर्जुन कपूरचा 'पानिपत'मधील लूक

अनोख्या अंदाजात त्याचा लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. 

Updated: Nov 4, 2019, 02:28 PM IST
शौर्याची नवी परिभाषा सांगतोय अर्जुन कपूरचा 'पानिपत'मधील लूक
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कित्येक पिढ्यांनंतरही इतिहासातील काही घटना मात्र आजही त्याच ताकदीने त्यांचं अस्तित्वं राखून आहेत. त्याच घटनांपैकी एक म्हणजे पानिपतची लढाई. कोणालाही कधीही विसर पडणार नाही, अशा या युद्धाची गाथा आता मोठ्या पडद्यावर साकारण्यात येत आहे ती 'पानिपत' या चित्रपटाच्या माध्यमातून. अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातील अर्जुनच्या लुकवरुनही निर्मात्यांनी पडदा उचलला आहे. 

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील तिन्ही पात्रांची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्यामध्ये एकिकडे क्रूरतेची परिसीमा आहे, दुसरीकडे राजधर्माची झलक आहे तर अर्जुनच्या रुपात साहसाची नवी परिभाषा आहे. 

'सदाशिव राव भाऊ' या भूमिकेची जबाबदारी पेलणाऱ्या अर्जुनने मोठ्या अनोख्या अंदाजात त्याचा लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. 'ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्यासाठी खंबीरपणे उभं राहणं म्हणजे साहस, शौर्य. मग तुम्ही एकटे असाल तरी बेहत्तर...', असं सूचक कॅप्शन देत त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'सदाशिव राव भाऊ' या अतीव महत्त्वाच्या भूमिकेत अर्जुन सर्वांचं लक्ष वेधत आहे. त्याचा लूक पाहताना रणवीरने साकारलेल्या बाजीराव पेशवा भूमिकेचीही आठवण होते. युद्धभूमीवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी सज्ज असणारा योद्धा त्याचं हे रुप पाहताना मन जिंकून जातो. तर, पोस्टरमध्ये दिसणारा भगवा झेंडा एका समर्पणाची जाणिवही करुन देतो. तेव्हा आता कलाकारांची प्रचंड मेहनत आणि इतिहासातील एका अशा विश्वासघाताची गोष्ट आता बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांचं युद्ध जिंकणार का, याकडेच साऱ्याचं लक्ष लागलं आहे.