मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानाच्या पत्नीने म्हणजेच ताहिरा कश्यप हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं. तिच्या आजारपणाविषयी आयुषमानलाही विचरण्यात आलं तेव्हा त्याचा या साऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनेकांनाच थक्क करुन गेला.
भल्याभल्यांचा आत्मविश्वास डगमगवून सोडणाऱ्या या आजाराशी ताहिरा मात्र मोठ्या खंबीरपणे झुंज देत आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर केलेली पोस्ट पाहून याविषयीचा सहज अंदाज लावता येत आहे. केमोथेरिपी सुरु असतानाच उपचारादरम्यानची तिची ही पोस्ट खऱ्या अर्थाने अनेकांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे.
'F*#k कॅन्सर' असं म्हणत तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या आजाराशी झुंज देतेवेळी आपण कशा प्रकारे एक खंबीर आणि धीट व्यक्ती म्हणून समोर आलो, हे तिने स्पष्ट केलं आहे.
'कॅन्सरशी लढा देताना तुम्ही असं काहीसं करता.... अर्थात हे आयुष्यातील अत्यंत कठीण वळण आहे. पण, माझ्यामध्ये किंबहुना आपल्या सर्वांमध्ये असणारी ताकद आणि धैर्य हे अशा प्रसंगांच्याच वेळी आपली परीक्षा घेत असतं', असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
आयुष्याच्या रंगमंचावरील या नाटकामध्ये मुख्य भूमिका ही आपणच निभावली पाहिजे, असा निर्धारच ताहिराने केला आणि याच वृत्तीने ती कॅन्सरशी झुंज देत आहे. आतापर्यंत तिच्या आजाराच्या उपचाराची प्रक्रिया ही अर्ध्यावर आली असून, त्यामुळे शरीरावर होणारे परिणाम आणि बदल याविषयीसुद्धा तिने एक ओळ लिहिली आहे.
डोक्यावर टोपी घातलेला हा लूक म्हणजे उपचारांचे परिणामच जणू, असं तिच्या या कॅप्शनमधून कळत आहे. सध्याच्या घडीला प्रसंग कितीही कठीण असला तरीही या आजाराशी लढण्यासाठीचं बळ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तिने आभार मानत हा लढा आपण जिंकण्याची आशा व्यक्त केली आहे.
मित्र आणि आप्तजनांना ज्यावेळी या आजारपणाविषयी कळलं तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. पण, त्यांनीच आपल्याला धीर दिला असं म्हणत ताहिराने ही पोस्ट लिहिली. तिची ही आणि यापूर्वीची प्रत्येक पोस्ट ही आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोनच सर्वांना देऊन गेली हे खरं.