मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या गेली. ज्यानंतर त्याच्या मृत्यूचं मुख्य कारण शोधण्यासाठी म्हणून पावलं उचलली गेल्याचं सर्वांनीच पाहिलं. पण, दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या मुलानं म्हणजेच बाबील यानं सोशल मीडियावर पोस्ट करत सुशांतच्या निधनाकडे एक कारण म्हणून न पाहता सत्याच्या बाजूनं उभं राहण्याची विनंती केली आहे.
सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर सुरु असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रावरही बाबलीनं भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन कलाविश्वात सुरु असणारं वादंग आणि कलाकारामध्येच पडलेले गट पाहता त्याची ही पोस्ट अनेकांना खडबडून जाग आणत आहे, असं म्हणायला हरकत नाही.
अभय देओल, निखिल द्विवेदी, अनुभव सिन्हा, कंगना रानौत, हंसल मेहता आणि इतरही कलाकारांनी कलाविश्वात चालणाऱ्या घराणेशाहीवर आपल्या भूमिका मांडल्या होत्या. पण, त्यातच एक स्टारकिड आणि परिस्थिती समजून घेऊन वक्तव्य करणाऱ्या बाबीलनं सर्वांच्या नजरा वळवल्या.
'घराणेशाहीविरोधात तुम्हाला बंड करायचं असेल तर खुशाल करा. पण, त्यासाठी सुशांतचा एक निमित्त म्हणून किंवा एक कारण म्हणून वापर करु नका. कोणत्याही परिस्थितीत जे योग्य आहे त्याच्याच बाजूनं उभे राहा', अशी स्पष्ट भूमिका त्यानं मांडली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने केलेली ही पोस्ट पाहता अद्यापही वडील इरफान खान आणि सुशांत सिंह राजपूत या दोन प्रामाणिक कलाकारांच्या अकाली निधनाच्या घटना तो पचवू शकलेला नाही हेच स्पष्ट होत आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सुरु असणाऱ्या तपासप्रक्रियेविषयी खुलेपणाने व्यक्त होत या प्रक्रियेतून सुशांतच्या आप्तजनांना, त्याच्या निधनातून सावरणाऱ्यांना दु:ख आणि वेदनांचाच सामना करावा लागेल, असं म्हटलं.