पत्रलेखाच्या राजकुमारा.... वाचा या सेलिब्रिटी जोडीची अनोखी प्रेमकहाणी

प्रत्येक प्रसंगात एकमेकांची साथ... 

Updated: Jan 27, 2019, 12:46 PM IST
पत्रलेखाच्या राजकुमारा.... वाचा या सेलिब्रिटी जोडीची अनोखी प्रेमकहाणी

मुंबई : 'परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का....' हे गाणं म्हटलं की एका खास व्यक्तीची आकृती मनात तयार होते आणि मग कल्पनांच्या दुनियेतच मन रममाण होतो. पण, एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या आयुष्यात मात्र खऱ्याखुऱ्या राजकुमाराचाच प्रवेश झाला आहे. त्यामुळे हे गाणं तिच्या प्रेमासाठी अर्थात त्यांच्या नात्याला खऱ्या अर्थाने शोभतंय असंच म्हणावं लागेल. ती अभिनेत्री म्हणजे पत्रलेखा आणि तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे अभिनेता राजकुमार राव. 

जवळपास आठ वर्षांपासून एकत्र असणाऱ्या पत्रलेखा आणि राजकुमार राव यांच्या प्रेमाचा सुरेख प्रवास 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये पहिल्या भेटीपासून ते अगदी राजकुमारने त्याच्या आईशी जेव्हा पत्रलेखाची भेट घडवून आणली तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती, इथवर माहिती दिली आहे. 

कारकिर्दीच्या अडचणीच्या वेळेपासून ते आतापर्यंत प्रत्येक प्रसंगामध्ये राजकुमारच्या रुपात खऱ्या अर्थाने आपल्याला समजून घेणाराच साथीदार मिळाल्याची भावना या पोस्टमध्ये पत्रलेखाने व्यक्त केली. तिच्यासाठी महागडं गिफ्ट आणण्यासाठी त्याने केलेली जुळवाजुळव असो किंवा मग प्रत्येक प्रसंगात तिला साथ देणं असो, प्रेम म्हणजे हेच तर असतं असं ती ठामपणे म्हणते. 

आपल्या या नात्यात कोणीच कोणापेक्षा श्रेष्ठ नसून, दोघंही एकसमान असल्याची बाबही तिने अधोरेखित केली. यामध्ये तिने राजकुमारसोबतच्या नात्याविषयी काही खास गोष्टीही सर्वांसमक्ष मांडल्या. येणाऱ्या काळात नात्याचं किंवा कशाचच भविष्य काय असणार हे आपण जाणतच नसलो तरीही हे क्षण, एकमेकांसोबत असणं, प्रत्येक प्रसंगात एकमेकांची साथ देणं हे इतकं आपल्यासाठी पुरेसं आहे, या शब्दांमध्ये पत्रलेखाने तिच्या आणि राजकुमारच्या नात्याचं सुरेख वर्णन केलं.