सायली पाटील, झी मीडिया, मुंबई :
दिग्दर्शक : झोया अख्तर
निर्माते : रितेश सिधवानी, झोया
अख्तर, फरहान अख्तर
भूमिका : रणवीर सिंग, आलिया भट्ट, कल्की कोचलीन, सिद्धांत चतुर्वेदी,
अमृता सुभाष
Gully Boy ‘नौकर का बेटा नौकर ही रहेगा...’, असं म्हणत जेव्हा समोरचा व्यक्ती परिस्थितीची जाणीव करुन देतो त्यावेळी मनावर जे काही वार होतात ते खऱ्याखुऱ्या तलवारीच्या वारांहून आणि त्यामुळे होणाऱ्या जखमेहून जास्त वेदनादायक असतात. अशाच वेदना एकवटत मुंबईच्या, किंबहुना धारावीच्या गल्लीबोळातून डोकं वर काढणाऱ्या स्वप्नांची जोड देत एक वास्तवदर्शी कथानक झोया अख्तरने प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. मुराद, सफिना, एम.सी.शेर, अशी पात्र ‘गली बॉय’च्या निमित्ताने सर्वांच्या भेटीला येतात. संगीत विश्वात ‘रॅप’ हा एक असा प्रकार आहे जो अजूनही अनेक बाबतीत दुर्लक्षित आहे, मुळात ज्याला अमुक एका प्रेक्षक वर्गाची पसंती मिळत नाही. हिप हॉप प्रकारात मोडणाऱ्या याच संगीत प्रकारात नावारुपास आलेल्या नॅझी आणि डिव्हाईन या रॅपर्सच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे.
धारावीच्या झोपड्यांत आणि गल्लीबोळात कलेचा हा वावर नेमका एक ज्वालामुखी बनून कशा प्रकारे कोंडलेला असतो आणि कसा त्याता उद्रेक होतो याचा प्रत्यय चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यातून येतो. वडिलांच्या दोन बायका, वयात येणारा मुलगा, त्याची स्वप्न आणि त्या वेगात निघालेल्या स्वप्नांना वारंवार वेसण घालणारी परिस्थिती पाहून खरी मुंबई आणि तिच्या प्रत्येक वाटेवर मिनिटामिनिटाला आव्हानांचा सामना करणारं आयुष्य मन विचलीत करुन जातो. रणवीरने साकारलेला ‘मुराद’ आणि आलिया भट्टने साकारलेली तोडफोड ‘सफिना’ पाहताना प्रेम करायला ‘जिगरा’ लागतो असंच म्हणावं लागेल. इथे तोडफोड आणि जिगरा असं म्हणण्याचं खरं कारण हे आलियाने साकारलेली ‘सफिना’ पाहिल्यावरच लक्षात येईल.
‘मुराद’चा ‘गली बॉय’ होण्यापर्यंतचा प्रवास पाहताना एका व्यक्तीची त्याच्या या वाटचाली असणारी साथ ही मन जिंकून जाते. ती व्यक्ती म्हणजे ‘एम.सी शेर’. सिद्धांत चतुर्वेदी याने साकारलेली ‘शेर’ची भूमिका रणवीरच्या तोडीस तोड आहे असं म्हणायला हरकत नाही. सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत असूनही खरा ‘गली बॉय’ होण्यासाठी ‘मुराद’ला प्रेरित करतो तोच हा ‘शेरा’. त्यामुळे या रॅपर्सच्या भाषेत म्हणावं तर हा ‘शेरा..... बहुत हार्ड’. अमृता सुभाष आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष ही खऱ्या आयुष्यातील आई- मुलीची जोडी गली बॉयच्या निमित्ताने सासू सुनेच्या रुपात समोर येते आणि अर्थातच मनं जिंकते. रणवीरची आई अमृता सुभाषने अगदी सुरेखपणे साकारली आहे, तर त्याच्या मित्रांच्या भूमिकेत दिसणारे सगळे चेहरे, ‘पंटर’ पाहताना अशी पात्र आपल्यालाही भेटल्याचं आठवतं. कल्कीने साकारलेली ‘स्काय’ची भूमिका तिला साजेशी आणि तितकीच उठावदार आहे. शब्दांची जुळवाजुळव करत रॅप सादर करणारे अनेक खरेखुरे रॅपर या चित्रपटात पाहायला मिळतात आणि त्यांचा अंदाज नकळतच मन जिंकून जातो. चित्रपटातील संवाद हे बंबईया हिंदीमध्ये असून, ते प्रत्येक दृश्याच्या अनुषंगाने अतिशय परिणामकारकपणे समोर येतात. म्हणजे अगदी ‘मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो उसको धोपटूंगी ना मै....’ असं म्हणणाऱ्या आलियापासून ‘ए कवले....’ असं म्हणत मित्राची टेर खेचणाऱ्या रणवीरपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी असणारे हे संवाद लक्षात राहण्याजोगे आहेत. त्यातही मध्येमध्ये येणारे लहानमोठे रॅपही लगेचच लक्ष वेधतात. ‘अपना टाईम आएगा...’, किवां ‘छोटे.... बहुत हार्ड.... बहुत हार्ड’ असं म्हणत दाद देणारी रॅपर्सची गर्दी पाहताना प्रेक्षकही नकळत तसेच व्यक्त होऊ लागतात.
घुसमट, मनात असणारे असंख्य प्रश्न, भेदभावाच्या सूत्रावर चालणाऱ्या समाजाच्या विरोधात पुकारलेला एल्गार, परिस्थितीने पिचलेली तरुणाई, त्यातच त्यांच्या आधाराला येणाऱ्या काही अशा वाटा, ज्या अर्थातच चुकीच्या पण त्यांचा उपोगाच्या अशी वास्तवदर्शी परिस्थिती अवघ्या काही तासांच्या चित्रपटांमध्ये मांडणाऱ्या झोया अख्तरचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कलाकारांची निवड करण्यापासून त्यांच्या पात्रांना अतिशय प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठीची मेहनत ही चित्रपच पाहताना लक्षात येते. सोबतच या निमित्ताने धारावीच्या गल्लीबोळातील आयुष्यात पुन्हा एकदा डोकावण्याची संधी मिळते आणि या मायानगरीचं खरं स्पंदन म्हणजे हेच... असे उद्गार नकळत ओठांवर येतात.
‘टपोरी’ म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या कलाकार वर्गाला झोया अख्तरने ज्या पद्धतीने रुपेरी पडद्याच्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे ते पाहता ‘गली बॉय’ हा चित्रपट म्हणजे रॅप, अर्थपूर्ण रॅप करणाऱ्या प्रत्येकाचाच चेहरा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही आणि हो म्हणूनच यापुढे ‘अपना टाईम आएगा...’ असं कोणी म्हणालं तर धक्का बसण्याचं काहीच कारण आता त्यांचंच नाणं खणखणीत वाजणार...
- चार स्टार