मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची पूर्वीश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड, अंकिता लोखंडे हिला जबर धक्का बसला होता. सुशांतच्या निधनानंतर तिनं त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. इतकंच नव्हे, तर अखेर मनात दाबून ठेवलेल्या दु:खाला तिनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.
सुशांतच्या आठवणीत देवापुढं दिवा लावणारी हीच अंकिता त्याच्या निधनानंतर बऱ्याच दिवसांनी घराबाहेर पडली तेव्हाही तिनं सर्वांचं लक्ष वेधलं. या वेळचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता किराणा मालाच्या दुकानातून काही सामानाची खरेदी करताना दिसत आहे. त्याचवेळी काही गरजू लहान मुलं दुकानाबाहेर उभी राहून तिच्याकडे पाहतानाही दिसत आहेत. त्या मुलांकडे पाहिल्यानंतर अंकिताने लगेचच चॉकलेट खरेदी करत त्यांच्यामध्ये वाटले. तिच्या या कृतीची सध्या सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे. अनेक चाहत्यांनी फॅन पेजच्या माध्यमातून तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
अंकिता आणि सुशांतच्या नात्याविषयी सांगावं तर, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. ज्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमाचं नातं आकारास आलं होतं. जवळपास ६ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांच्याही नात्यात काही कारणास्तव दुरावा आला होता. त्यांच्या नात्यात आलेला दुरावा हा अनेकांना धक्का देऊन गेला. पण, अखेर आपल्या करिअरच्या वाटेवर निघालेल्या या दोघांनीही खासगीतील गोष्टी जाहीर करणं सातत्यानं टाळल्याचं पाहायलाही मिळालं.