मुलींसह 'खास' व्यक्तीकडून सुष्मिताला मिळालं सरप्राईज

पाहा असा साजरा झाला तिचा यंदाचा वाढदिवस....

Updated: Nov 20, 2019, 01:18 PM IST
मुलींसह 'खास' व्यक्तीकडून सुष्मिताला मिळालं सरप्राईज  title=
छाया सौजन्य- व्हिडिओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : 'दिलबर गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने काही वर्षापासून रुपेरी पडद्यापासून दूर राहण्याला पसंती दिली आहे. कोणताही चित्रपट, कार्यक्रम यांचा सुष्मिता भाग नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती इतर सर्व सेलिब्रिटींप्रमाणेच बऱ्यापैकी सक्रीय आहे. याच माध्यमातून तिने चाहत्यांसोबतचं नातंही जपलं आहे. सध्या सुष्मिता याच माध्यमामुळे अनेकांना तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टीही सांगत आहे. 

जीवनाच्या एका सुरेख टप्प्यावर असणाऱ्या या अभिनेत्रीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसाच्या निमित्ताने सुष्मिताला तिच्या दोन्ही मुली, जवळची काही मंडळी आणि प्रियकर रोमन शॉल यांनी खास भेटही दिली. ही भेट होती, एका छोटेखानी पण, तितक्याच हव्याहव्याश्या बर्थडे पार्टीची. 

खुद्द सुष्मितानेच या खास पार्टीचा व्हिडिओ पोस्ट केला. जो पाहता नेटकऱ्यांनाही तिचा हेवा वाटला. सुष्मितासाठी तिचा प्रियकर रोमन शॉल, दोन्ही मुली आणि तिच्या जवळच्या व्यक्तींनी गच्चीचा कायापालट करत तिथे साजेशी रोषणाई आणि सजावट केली होती. पांढऱ्या ओढण्यांपासून तयार करण्यात आलेला शामियाना, रंगीत फुग्यांची सजावट, शुभेच्छांची पत्र आणि अर्थातच सुष्मितासाठी तयार करण्यात आलेला एक खास केक अशी सर्व व्यवस्था या मंडळींनी केली होती. 

ही अतीशय भारावणारी आणि जादुई सायंकाळ होती. मी जे स्वप्न पाहिलं होतं, त्याहीपेक्षा जास्त गोष्टी मला मिळत असल्याचं कॅप्शनमध्ये लिहित तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रियकर आणि मुलींनी मिळून दिलेल्या या अनपेक्षित पार्टीची आपल्याला पुसटशीही कल्पना नसल्याचंही तिने कॅप्शनमध्ये म्हटलं. मुळात हे सर्व भाव सुष्मिताच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळत आहेत. एकंदरच, यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी बऱ्याच अनपेक्षित आणि तितक्याच आनंददायी गोष्टी घेवून आला, अलं म्हणायला हरकत नाही.