प्रियांकाच्या लग्नाविषयी दीपिकाकडून महत्त्वाचा खुलासा

रिलेशनशिपमध्ये प्रामाणिक राहण्याला प्राधान्य देऊनही... 

Updated: Dec 30, 2018, 01:37 PM IST
प्रियांकाच्या लग्नाविषयी दीपिकाकडून महत्त्वाचा खुलासा

मुंबई : कलाविश्वातील दोन आघाडीच्या अभिनेत्रींचे चित्रपट काय एकाच दिवशी प्रदर्शित झाले किंवा त्यांच्या लग्नसोहळ्यांची तारीख एकसारखीच असली तर चर्चा सुरु होते ती म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या मतभेदांची. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्याविषयी अशाच चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. पण, त्या दोघींमध्ये असणारी मैत्री या चर्चांवर खऱ्या अर्थाने भारी पडली अस म्हणायला हरकत नाही. 

नुकतच दीपिकाने एका मुलाखतीत प्रियांकाला तिच्या लग्नाविषयी शुभेच्छा देत, 'देसी गर्ल'च्या खासगी आयुष्याविषयी अत्यंत महत्त्वाचा असा खुलासा केला आहे. 'फिल्मफेअर' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली. 'तिला नात्यांच्या बाबतीत नेहमीच स्थैर्य हवं होतं. मी त्याला (निकला) फारसं ओळखत नाही. पण, हो, त्याच्यासोबत तिला ते स्थैर्य गवसलं आहे. मी तिला जितकी ओळखते त्यावरुन मी एक सांगू शकते की या गोष्टीच तिच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आयुष्यात प्रेम मिळवणं, हक्काचं असं एक माणूस मिळवणं जे सर्वस्वाने तिचच असेल, ज्याच्या येण्याने नात्यामध्ये स्थैर्य येईल याच्याच ती शोधात होती. आता तिला या साऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत हे पाहून मला फारच आनंद होत आहे, कारण इथपर्यंतचा तिचा प्रवास हा फारसा सोपा नव्हता', असं दीपिका म्हणाली. 

याच मुलाखती तिने स्वत:च्या खासगी आयुष्याविषयीही काही खुलासे केले. रणवीरला भेटण्यापूर्वीही आपण बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट करत प्रत्येक वेळी आपला विश्वासघात केला गेल्याचंही तिने सांगितलं.

मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी आपण सर्वस्व पणाला लावून रिलेशनशिपमध्ये प्रामाणिक राहण्याला प्राधान्य देऊनही अनेकदा हाती निराशाच आल्याचा उलगडाही तिने केला. रणवीर आपल्या आयुष्यात आल्यानंतर इतर कोणाचाही विचारही मनात आला नसल्याचं सांगत त्याच्यावर आणि या नात्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचंही दीपिकाने या मुलाखतीत सांगितलं.