आधी यांना Virgin अभिनेत्री लागत होत्या.... अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

चित्रपटांच्या दुनियेतील झगमगणारं रुप सर्वांच्याच पसंतीस उतरतं. पण... 

Updated: Oct 16, 2021, 10:12 AM IST
आधी यांना Virgin अभिनेत्री लागत होत्या.... अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चित्रपटांच्या दुनियेतील झगमगणारं रुप सर्वांच्याच पसंतीस उतरतं. पण, या लखलखणाऱ्या पडद्यामागे मात्र काही अशाही गोष्टी आहेत ज्या फार क्वचितच सर्वांसमोर येतात. अशीच एक गोष्ट एका अभिनेत्रीमुळं समोर आली आहे. एक अभिनेत्री म्हणून काही काळापूर्वी चित्रपट जगतामध्ये वावरत असताना नेमकी काय परिस्थिती होती, याचा खुलासा तिनं केला आहे. 

सध्याचं म्हणावं तर महिला कलाकारांना या चित्रपट वर्तुळामध्ये अधिक चांगली वागणूक, प्रतिसाद मिळत आहे असं म्हणणारी ही अभिनेत्री आहे महिमा चौधरी. महिमा मागील बऱ्याच काळापासून या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण, चाहत्य़ांच्या मनात असणारं तिचं स्थान मात्र कायम आहे. 

नुकतंच एका मुलाखतीत तिनं अभिनेत्रींसाठी बॉलिवूडमध्ये रुंदावणाऱ्या कक्षांबद्दल वक्तव्य केलं. 'हल्ली अभिनेत्रींसाठी बरंच सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांना चांगल्या भूमिका, चांगलं मानधन, चांगल्या जाहिराती मिळत आहेत. अभिनेत्री एका चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्यांची कारकिर्दही दीर्घकालीन दिसत आहे', असं ती म्हणाली. 

आधी मात्र परिस्थिती वेगळी... 
सध्या काळानुरुप चित्रपट जगतामध्ये अभिनेत्रींबाबतचा दृष्टीकोन बदलला पण, आधी मात्र चित्र वेगळं होतं. याचा खुलासा महिमानं केला. 'तुम्ही कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहात त्या क्षणापासून तुमची चर्चा सुरु होत असे. त्यांना फक्त व्हर्जिन, कोणालाही किस न केलेल्या अभिनेत्री लागत होत्या. तुम्ही कोणाला डेट केलंत तर चर्चा होत होत्या, तुम्ही विवाहित असाल तर विसरा.... त्यातही तुम्हाला मुलबाळ असेल तर कारकिर्द संपलीच म्हणून समजा', अशी परिस्थिती होती. 

आता मात्र दोनपैकी एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य अभिनेत्रींकडे आहे. आता गरोदरपणानंतरही, किंवा लग्न झाल्यानंतरही अभिनेत्रींना रोमँटीक भूमिका दिल्या जातात. त्यांचं खासगी आयुष्य सकारात्मकतेनं हाताळलं जातं, असं महिमा म्हणाली. 

1997 मध्ये महिमानं 'परदेस' या चित्रपटातून महिमानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सुभाष घई यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटामध्ये तिनं शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती.