डॉक्टर, टेलरकडून झालं शोषण; बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Updated: Oct 18, 2021, 12:27 PM IST
डॉक्टर, टेलरकडून झालं शोषण; बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : वयाच्या काही टप्प्यांवर अनेक अडचणी किंवा विचित्र प्रसंगांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. कलाकार मंडळीही यापासून वेगळे राहिलेले नाहीत. सेलिब्रिटी वर्तुळात बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या जीवनातील काही विक्षिप्त प्रसंगांचा खुलासा केला आहे. सध्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत घडलेल्या अशाच एका गोष्टीचा उलगडा झाला असून, सर्वांनाच धक्का बसला आहे. 

बालपणी डॉक्टर आणि टेलरकडून आपलं शोषण करण्यात आल्याचा खुलासा करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे नीना गुप्ता. काही दिवसांपासून 'सच कहूँ तो' या आत्मचरित्रपर पुस्तकामुळे नीना गुप्ता मागील काळापासून चर्चेत आहेत. या पुस्तकात त्यांनी चांगल्या, वाईट अशा अनेक प्रसंगांचा उलगडा केला आहे. शोषणाचा मुद्दाही त्याचाच एक भाग. 

आपल्यावर ओढावलेल्या या परिस्थितीबाबत सांगताना त्यांनी लिहिलं, 'मी एका ऑप्टीशनकडे गेले होते. भावाला बाहेर वेटिंग रुममध्ये थांबवलं होतं. डॉक्टरनं माझे डोळे तपासण्यास सुरुवात केली, हे करता करता तो शरीराचे ते भागही तपासू लागला ज्यांचा डोळ्यांशी काहीच संबंध नव्हता. हे सर्व होत असताना मी वाईट पद्धतीनं घाबरलेले होते. घरी परतत असताना मला किळस वाटत होती. घरी आल्यावर एका कोपऱ्यात बसून मी फार रडले होते.' टेलरकडे गेलं असताही नीना गुप्ता यांना अशाच प्रसंगाचा सामना केला होता. 

आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगाबाबत नीना गुप्ता यांनी आईला काहीच सांगितलं नव्हतं. यासाठी आई आपल्यालाच दोष लावेल या भीतीपोटी त्या काहीही बोलल्या नव्हत्या. नीना गुप्ता यांच्याकडून करण्यात आलेला हा खुलासा सर्वांच्याच भुवया उंचावून गेला.