प्रतिकूल विचारसरणी तुमच्याकडेच ठेवा; रवीना टंडनचा झायराला टोला

झायराने धर्म आणि इतर काही महत्त्वाची कारणं देत चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला

Updated: Jul 1, 2019, 12:10 PM IST
प्रतिकूल विचारसरणी तुमच्याकडेच ठेवा; रवीना टंडनचा झायराला टोला  title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात साधारण पाच वर्षांपूर्वी पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री झायरा वसिम हिने रविवारी एक महत्त्वाचा निर्णय सर्वांसमोर ठेवला. 'दंगल गर्ल' म्हणून लोकप्रिय असणाऱ्या झायराने आपण निवडलेलं करिअर हे धर्म आणि काही समजुती, विश्वासाच्या आड येत असल्याचं कारण देत हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. 

झायराच्या याच निर्णयानंतर कलाविश्वात अनेकांनीच याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन हिने झायराच्या या निर्णयावर तिला चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळालं. 'सर्वकाही (यश, प्रसिद्धी) दिल्यानंतरही अवघ्या दोन चित्रपटांची कारकिर्द असणारे या कलाविश्वाचे ऋणी नाहीत.... तर ठीक आहे. याने काहीच फरक पडत नाही. फक्त एकच इच्छा आहे, की त्यांनी अतिशय सुरेखपणे यातून काढता पाय घ्यावा आणि हे सर्व प्रतिकूल विचार स्वत:पुरताच सीमीत ठेवावेत', असं ट्विट तिने केलं. 

कलाविश्वाशी आपलं असणारं नातं यावेळी सर्वांपुढे ठेवत रवीनाने लिहिलं, 'काहीही असो... सर्वांनाच मिळणाऱ्या संधी पाहता, मी या कलाविश्वाच्या बाजून तितक्याच आत्मियतेने उभी असेन. या विश्वातून काढता पाय घेणं हा सर्वस्वी तुझा निर्णय असून, त्यामागे तुझीच काही कारणं आहेत. पण, त्यासाठी तू इतरांच्या नजरेत या क्षेत्राला नाव ठेवू नकोस'. 

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकजण हा बरोबरीनेच वागतो आणि वागवतो, असं म्हणत रवीनाने या झगमगाटाच्या दुनियेत जात, धर्म, पंथ किंवा तुम्ही ज्या वर्गातून येता त्या आधारावर कधीच दुजाभाव केला जात नाही हा मुद्दा मांडला. भारतीय कलाविश्वाप्रती रवीनाने आदर व्यक्त करत झायराने दिलेल्या कारणावर नाराजी व्यक्त केली.