कर्करोगाच्या निदानानंतर...., पतीसाठी सोनालीची भावनिक पोस्ट

शब्दांवाटे तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली   

Updated: Nov 12, 2019, 07:53 PM IST
कर्करोगाच्या निदानानंतर...., पतीसाठी सोनालीची भावनिक पोस्ट
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर राहात तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केलं. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर तिने मोठ्या धीराने या आजाराचा सामना करत त्यावर मात केली. तिचा हा संघर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक चाहत्याने पाहिलासुद्धा. अशी ही सोनाली पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी निमित्त ठरत आहे ते म्हणजे तिच्या लग्नाचा वाढदिवस. 

पती गोल्डी बहलसोबतचा एक फोटो पोस्ट करत सोनालीने त्याच्यासाठी आणि त्यांच्या नात्याप्रतीच्या सर्व भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ''गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात होतो. तेव्हापासून बेंद्रे आणि बहल यांनी दोन काळ पाहीले. एक म्हणजे 'बीसी' (बीफोर कॅन्सर म्हणजेच कॅन्सरपूर्वीचा) आणि दुसरा म्हणजे 'एसी' (आफ्टर कॅन्सर म्हणजेच कॅन्सर नंतरचा). त्यानंतर मी लक्ष काही दुसऱ्या गोष्टींवर केंद्रीत करण्यास त्या गोष्टींमध्ये हात आजमावण्यास सुरुवात केली. पुनरुज्जीवनाकडे मी जास्त भर दिला'', असं लिहित तिने लग्नाच्या १७व्या वाढदिवसानिमित्त एका अनोख्या आणि अविस्मरणीय प्रवासाची आपण निवड केल्याचं स्पष्ट केलं. 

आपल्या पतीने यापूर्वी असं कधीच केलं नव्हतं, कर्करोगाचं निदान होण्यापूर्वी त्याने अशा कोणत्याच गोष्टी केल्या नसत्या असं म्हणत सध्याच्या घडीला त्याच्यामध्ये झालेल्या बदलाचं तिने स्वागत केलं. पती आपल्याला अधिक जपत असल्याचं म्हणत आपणही त्याला वेळ देऊ शकत असल्याचं तिने या सुरेख पोस्टमध्ये स्पष्ट केलं. 

पोस्टच्या शेवटी तिने पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा देत तो आपला आधार असल्याची नि:स्वार्थ भावना व्यक्त केली. सोनाली आणि तिच्या पतीच्या नात्यात आलेलं एक अनपेक्षित वळण हे त्यांच्या जीवनावर परिणाम करुन गेलं खरं. पण, या धक्कादायक वळणाने पुन्हा एकदा त्यांचं नातं नव्याने खुललं हे खरं.