मुंबई : जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणारी अभिनेत्री सुष्मिता सेन आजही तितकीच लोकप्रिय आहे. 1997 मध्ये तिनं महेश भट्ट यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटानं तिला फारसं यश दिलं नाही. पण, त्यानंतर मात्र तिच्या करिअरला चांगला वेग मिळाला. (Sushmita sen)
पुढे सुष्मिता अचानकच रुपेरी पडद्यापासून दूर गेली. पण, तेव्हाही तिचा प्रवास तितकासा सोपा नव्हता.
बऱ्याच वर्षांनंतर सुष्मिताच्या आयुष्यात रोमन शॉलच्या रुपात प्रेमाचा बहर आला होता. पण, त्यातही तिला अपयश आलं. नात्याता आलेल्या दुराव्यातून आता कुठे ही अभिनेत्री सावरताना दिसत आहे.
सुष्मिता एक मोठा काळ कला जगतापासून दूर होती. पण, यामागे एक मोठं कारणंही होतं. तिला हिंदी चित्रपट जगतामध्ये कोणीही काम देत नव्हतं. तिचं वय, पडद्यावर अपेक्षित वय या साऱ्या तफावतीमुळे हे सर्व घडून येत होतं.
मनाजोग्या आणि अपेक्षित भूमिका तिला मिळत नव्हत्या. एका अभिनेत्रीसाठी हे असं होणं, सहाजिकच आव्हानात्मक होतं.
दरम्यानच्या काळात या वेदनांचा सामना करत असतानाच सुष्मिताला आपण नेमकं काय करावं आणि काय करु नये याचा अंदाज येऊ लागला.
तिनं आपल्या दोन्ही मुलींचं या काळात उत्तम संगोपन केलं. यादरम्यान त्या दोघींवर तिनं सर्वात जास्त लक्ष दिलं.
आपण लोकांशी संपर्क ठेवण्यामध्ये फारसे तरबेज नसल्याचं सांगत या कारणामुळंही काम मिळालं नसावं ही शक्यताही तिनं नाकारली नाही.
जवळपास 10 वर्षांच्या अंतरानंतर 2020 मध्ये तिनं 'आर्या' या सीरिजमधून दणक्यात पुनरागमन केलं. या सीरिजचा दुसरा भागही प्रेक्षकांना भावला. ज्यानंतर आता सीरिजची टीम त्याच्या तिसऱ्या भागावर काम करत आहे.