यशस्वी अभिनेत्री असूनही तापसीला 'या' गोष्टीची खंत

ती असं का म्हणाली... 

Updated: Sep 16, 2019, 11:28 AM IST
यशस्वी अभिनेत्री असूनही तापसीला 'या' गोष्टीची खंत  title=
तापसी पन्नू

मुंबई : 'बदला', 'बेबी' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नू हीने फार कमी वेळात उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. आव्हानात्मक भूमिकांना मोठ्या शिताफीने हाताळणाऱ्या तापसीने अभिनेत्रीची साचेबद्ध भूमिका कायमचच दूर सारली. बंड करणारी, कोणत्याही क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभी राहणारीच भूमिका तिने कायम निवडली. 

तापसीच्या याच कौशल्याच्या बळावर सोशल मीडियापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत अनेकांनाच तिचा हेवाही वाटतो. पण, या साऱ्यामध्ये तिला एका गोष्टीची खंत आहे. काही दिवसांपूर्वीच तापसी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये  पोहोचली होती. तेव्हा दिल्लीत खरेदी करतेवेळी तिला एका अडचणीचा सामना करावा लागला. 

तापसीनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितलं. 'मी दिल्लीत जन्मले आणि इथेच लहानाची मोठीही झाले. खरेदी करण्यासाठीही दिल्लीतच माझा फेरफटका असायचा. पण, आता मात्र दिल्लीतील वाटांवर चालत मी खरेदी करु शकत नाही. फक्त मीच नव्हे, तर ज्यांच्यासोबत मी खरेदी करण्यासाठी निघते त्यांनाही काही अडचणींचा सामना करावा लागतो', असं तापसी म्हणाली. प्रेक्षक मला आणि माझ्या कामाला पसंती देतात, प्रशंसा करतात याचा मला आनंद आहे. पण, अनेकदा गोष्टी प्रमाणाबाहेर जातात आणि तेव्हा स्वत:ची अशी अपेक्षित जागाच गवसत नाही, असं वाटू लागतं अशा स्पष्ट शब्दांत तिने वास्तव सर्वांसमोर ठेवलं. 

एकदा एखाद्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला तर त्याचा थेट अर्थही नकारच असतो, असं म्हणत तापसीने एक सेलिब्रिटी नव्हे, तर व्यक्ती म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. सेलिब्रिटी झाल्यावर आपल्या आयुष्याला कलाटणी मिळ्लायाचं म्हणत आता आपल्याकडे मोकळेपणाने वावरण्यासाठी पुरेशी मोकळीक नसल्याचंही सांगितलं. 

सेलिब्रिटी होण्यापूर्वी आपण मित्रमंड़ळींसोबत बराच वेळ व्यतीत करायचो असं म्हणत आठवणी जागवणाऱ्या तापसीने आता मात्र या सर्व गोष्टी न करता येण्याची खंत व्यक्त केली. कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या प्रसिद्धीचा त्यांच्या कुटुंबीयांनाही सामना करावा लागतो, हेच सांगत गोष्टी कशा हाताळाव्यात हे अनेकदा कुटुंबीयांना लक्षात येत नाही, कारण माझ्याप्रमाणे त्यांच्याकडून अनेकदा परिस्थिती सांभाळली जात नाही, ही महत्त्वाची बाब तापसीने अधोरेखित केली. 

कलाविश्वाप्रमाणेच खासगी आयुष्यालाही केंद्रस्थानी ठेवणाऱ्या तापसीने खुलेपणाने तिच्या वाट्याला येणाऱ्या काही अडचणी सर्वांसमोर मांडल्या. मुळात एक कलाकार कायमच सुखावह आयुष्याचा उपभोग घेत नसतो हेच बोचरं सत्य तिने सर्वांसमोर ठेवलं.